पहिल्या इलेक्ट्रिक चार्जिग वाहनतळाला प्रतिसाद


पहिल्या इलेक्ट्रिक चार्जिग वाहनतळाला प्रतिसाद
Advertisement

पहिल्या इलेक्ट्रिक चार्जिग वाहनतळाला प्रतिसाद

पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असली तरी ती चार्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणेही आता आवश्यक आहे.


दहा दिवसांत वीस वाहनचालकांकडून लाभ

मुंबई : दादर पश्चिमेकडील पालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिगची सुविधा कार्यान्वित केल्यानंतर गेल्या दहाच दिवसांत २० वाहनचालकांनी या सुविधेचा लाभ घेतला. तसेच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिक या वाहनतळावर येऊन इलेक्ट्रिक गाडय़ा खरेदी करण्याबाबत विचारणा करीत असल्याचे चित्र आहे.

पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असली तरी ती चार्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणेही आता आवश्यक आहे. त्यामुळे दादर येथील पालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेली चार्जिगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या सुविधेचे उद्घाटन १७ ऑगस्टला झाले. गेल्या दहा दिवसांत या वाहनतळावर २० वाहनचालकांनी गाडय़ा चार्ज करण्याच्या सुविधेचा लाभ घेतल्याची माहिती जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. अनेक नागरिक वाहनतळावर येऊन या सुविधेबाबत चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. चार्जिगची सुविधा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यावरणस्नेही वाहन खरेदी करण्यास चालना मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

२४ तासांत ७२ वाहनांचे चार्जिग

या ठिकाणी २४ तासांमध्ये साधारणपणे ७२ इलेक्ट्रिक वाहने चार्ज होऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहन पूर्ण चार्ज होण्यासाठी २० युनिट्स – ३० युनिट्स लागतात ज्याची किंमत २०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. वाहन उभे करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अ‍ॅपद्वारे आरक्षण सुविधा उपलब्ध असून ‘ओटोपार्क मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’द्वारे कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर ऑनलाइन आरक्षित करता येईल.

सात वाहनांसाठी सुविधा

या ठिकाणी एका वेळी सात इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिग करता येते. यापैकी चार जलद चार्जर असून, या प्रत्येक चार्जरद्वारे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एका वेळी चार वाहने चार्ज करता येऊ शकतात, तर तीन चार्जरची गती संथ असून याद्वारे एक वाहन चार्ज करण्यास साधारणपणे सहा तासांचा कालावधी लागतो. प्रति युनिट १५ रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. हे चार्जिग स्टेशन आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती दिघावकर यांनी दिली.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या