स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात साकारलेल्या महान चित्रकृतीवर जळमटे!


स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात साकारलेल्या महान चित्रकृतीवर जळमटे!

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात साकारलेल्या महान चित्रकृतीवर जळमटे!


चित्रकृतीच्या निर्मात्याकडून अखेर स्वत: हाती झाडू घेत सफाई

नगर : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव निमित्ताने निर्माण केलेली ‘सारे जहाँसे अच्छा’ या देशातील एकमेवाद्वितीय, महान चित्रकृतीची स्वातंत्र्याच्या ७५ व्या महोत्सवात पदार्पण करताना तिची महापालिकेकडून हेळसांड होत असल्याचे पाहून अखेर या चित्रकृतीच्या निर्मात्याला, चित्रकृतीच्या सफाईसाठी झाडू हाती घ्यावा लागला. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्वत:च या चित्रकृतीला लागलेली जळमटे व परिसराची सफाई केली. चित्रकर्त्यांने उद्विग्न होऊन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या कृतीनंतर शहरभर या घटनेची चर्चा झाली. अनेकांनी कांबळे यांच्याशी संपर्क साधून महापालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. मात्र मनपाचे पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांनी या घटनेची दखलही घेतली नाही. मनपाच्या या बेदखलीबद्दल नागरिकांत अधिक संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना येथील प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी १९९७ मध्ये ‘सारे जहाँसे अच्छा’ ही अद्भुत कलाकृती मनपाच्या महावीर कलादालनात साकारली. ७० फूट बाय २० फूट आकाराचे हे पेन्सिल चित्र आहे. यामध्ये भारत मातेसह आजवर झालेले थोर ५०१ व्यक्तिमत्त्व साकारली आहेत. महावीर कलादालन ही वास्तू मनपाची आहे. एके काळी तेथे ग्रंथालय चालवले जाई. चित्रकारांची प्रदर्शने आयोजित केली जात. परंतु शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली वास्तू आज धूळखात पडली आहे. कांबळे यांची चित्रकृती पाहण्यासाठी देशभरातून नागरिक येतात. चित्रकृतीचे कौतुक करतात. मात्र कलादालन व परिसराची झालेली धूळधाण पाहून नाराजी व्यक्त करतात. या चित्रकृतीवर जळमटे साचली आहेत. भिंतीला पोपडे आले आहेत. छत गळत असल्याने पाण्याचा पाझर सुरू असतो. यामुळे चित्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे. चित्रकृती रेखाटण्यासाठी कांबळे यांनी स्वखर्चाने भिंतीवर प्रक्रिया केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी चित्रकृती पाहण्यासाठी काही नागरिक व पर्यटक आले होते. त्यांनी चित्रकृतीवर निर्माण झालेली जळमटे पाहून आपल्या भावना कांबळे यांच्याकडे व्यक्त केल्या. आपण निर्माण केलेल्या चित्रकृतीची अशी दुरवस्था निर्माण झाल्याचे लक्षात येऊन उद्विग्न झालेल्या कांबळे यांनी अखेर हाती झाडू घेतला व जळमटे काढून टाकली. परिसराची स्वच्छता केली. दुपारी साडेबारा ते अडीच अशी दोन तास त्यांनी अंगमेहनत करून साफसफाई केली.या कलादालनाकडे, प्रसिद्ध चित्रकृतीकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक या कलादालनाचा गैरवापरही करत आहेत. त्या समोरून गटारीचे पाणी वाहत असते. कला दालनात जाण्यासाठी नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते.

कलादालनाची देखभाल संस्थेकडे सोपवावी

भारतमाता व तिचे ५०१ थोर सुपुत्र यांचे ‘पेन्सिल रेखाचित्र’ असलेली ही देशातील एकमेव कलाकृती आहे. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना या चित्रकृतीची निर्मिती झाली. देशातून ही चित्रकृती पाहण्यासाठी पर्यटक येतात. परंतु त्यावर जमा झालेली जळमटे पाहून त्यांचे मन उद्विग्न होते. परिसर अस्वच्छ झालेला आहे. मनपाने स्वत: या कलादालनाची देखभाल करावी किंवा एखाद्या संस्थेकडे ही वास्तू व चित्र देखभालीसाठी सोपवावे. परंतु चित्रकृतीची झालेली दुरवस्था व त्याला निर्माण झालेला धोका पाहावत नाही.– प्रमोद कांबळे, चित्र शिल्पकार, नगर

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments