वीज देयक भरण्यासाठी तगादा

वीज देयक भरण्यासाठी तगादा
महावितरण कर्मचाऱ्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी
मोठी थकबाकी नसतानाही महावितरणचे कर्मचारी चालू महिन्यातील वीज देयक का भरले नाही, याबाबत ग्राहकांना गृहभेट देवून विचारणा करीत आहे. यात काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट बोलत असून धमकीही देत असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत. विशेष म्हणजे देयक मिळून अवघा एक दिवसही झालेला नाही त्यांनाही लगेच याबाबत विचारणा होत आहे.
टाळेबंदी शिथिल केल्यानंतर महावितरणाने देयक वसुलीचा धडाका लावला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे, तर दुसरीकडे चालू देयक भरण्यासाठीही आता महावितरण कर्मचारी ग्राहकांच्या घरी जात भेटी घेत आहेत.
वीज देयक वेळेवर भरा म्हणून समुपदेशन केले जात आहे. मात्र यात अनेक कर्मचारी वसुली अधिकारी असल्याचा आव आणत अत्यंत उर्मट भाषेत ग्राहकांशी बोलत आहेत. या बाबत सीवूड्स रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका ग्राहकाने सांगितले की, घराच्या महिला व वडीलधाऱ्यांसमोर महावितरण कर्मचाऱ्यांनी माझा अपमान केला. माझे वीज देयक मिळून २४ तासही पूर्ण झालेले
नाहीत, तोच वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. तर कोपरखैरणेतील एका महिलेनेही संताप व्यक्त केला आहे. महिलांशी कसे बोलावे याचेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी आपले नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला कारण महावितरण कर्मचारी आमचा वीजपुरवठा खंडित करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
वीज ग्राहकांना समजावून सांगण्यात यावे हा हेतू आहे. मात्र असे घडत असेल तर त्याचे समर्थन केले जाणार नाही. अशा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. -राजाराम माने, अधीक्षक, महावितरण
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment