आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी १०० कोटींचे कर्जरोखे

आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी १०० कोटींचे कर्जरोखे
सामंजस्य करारानुसार ‘युएनडीपी’ महापालिकेला आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी तांत्रिक सहकार्य करत आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यादृष्टीने आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तीन वर्षे कालावधीसाठी १०० कोटींचे कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) दिल्लीतील कार्यालयासोबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे.
शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे ‘सोशल इम्पॅक्ट बॉण्ड’च्या (एसआयबी) माध्यमातून बळकटीकरण तसेच सेवेत सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत आगाऊ खासगी गुंतवणूक करण्यात येईल. महापालिकेने निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यावर त्याची परतफेड करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि अंमलबजावणीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पालिका सभेने मंजूर केला आहे. यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. ‘एसआयबी’ ही नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा करणारी पध्दत आहे. त्यानुसार, या प्रकल्पासाठी नियुक्त केलेले गुंतवणूकदार आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी गुंतवणूक करतील. करारानुसार निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर महापालिकेकडून त्या गुंतवणुकीची परतफेड केली जाईल. ही उद्दिष्टे पूर्ण न झाल्यास गुंतवणूकदाराला पैसे न मिळण्याची जोखीम स्वीकारावी लागणार आहे. आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे महत्त्वाचे कार्यक्षेत्र असलेली ‘युएनडीपी’ ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था आहे.
सामंजस्य करारानुसार ‘युएनडीपी’ महापालिकेला आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी तांत्रिक सहकार्य करत आहे. याशिवाय, योजनेतील टप्पे निर्धारित करणे, मूल्यमापन करणे, गुंतवणूकदार शोधणे यासाठी त्यांनी मदत करणे अपेक्षित आहे. आरोग्य सेवा केंद्रांच्या क्षमतेत वाढ होणे, द्वितीय स्तरावरील सात रुग्णालयात प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतर लागणाऱ्या सुविधांचे बळकटीकरण करण्याबरोबरच या सुविधांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवणे, रुग्णालयात लागणारे साहित्य, प्रयोगशाळा आदी सेवांमध्ये सुधारणा करणे, चव्हाण रुग्णालयात इतर आवश्यक उपचारांची क्षमता वाढवणे आदी परिणाम या गुंतवणुकीद्वारे साधणे शक्य होणार असल्याचे आरोग्य-वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
अंमलबजावणीसाठी समिती
प्रकल्प अंमलबजावणीसाठी पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, वैद्यकीय विभागप्रमुख, अधिष्ठाता, चव्हाण रुग्णालय यांचा समितीत समावेश आहे.
या निर्णयानुसार निर्धारित उद्दिष्टे पूर्ण झाल्यास पिंपरी पालिकेची रुग्णालये, दवाखान्यांची क्षमता वाढेल. सध्या सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी होईल. खासगी रुग्णालयांप्रमाणेच पालिका रुग्णालयांमध्येही प्रभावी उपचार मिळू शकतील. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य-वैद्यकीय अधिकारी
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment