तेजीची विक्रमी धाव अविरत!


तेजीची विक्रमी धाव अविरत!

तेजीची विक्रमी धाव अविरत!


मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी उच्चांकांना गवसणी घालणारी धाव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी सुरू राहिली. जागतिक बाजारांचे नकारात्मक संकेत पाहता गुंतवणूकदारांचा होरा माहिती-तंत्रज्ञान, औषध निर्मिती, ग्राहकोपयोगी उत्पादन यासारख्या बचावात्मक क्षेत्रातील समभागांच्या खरेदीकडे वळल्याचे मात्र दिसून आले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्सने सोमवारच्या तुलनेत आणखी २०९.६९ अंशांची भर घालून, ५५,७९२.२७ या सार्वकालिक अत्युच्च पातळीवर बंद नोंदविला. मंगळवारच्या व्यवहारातील सेन्सेक्सने ५५,८५४.८८ अशा अभूतपूर्व शिखरांपर्यंत मजल मारली होती. निफ्टी निर्देशांकाचा बंद स्तरही १६,६१४.६० असा अभूतपूर्व राहिला. सोमवारच्या तुलनेत या निर्देशांकाने ५१.५५ अंशांची कमाई केली. दिवसभरातील व्यवहारात १६,६२८.५५ अशा उच्चांकापर्यंत त्याने मजल मारली होती.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० समभागांपैकी टेक महिंद्र ३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविली, त्या खालोखाल टीसीएस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांनी वाढ साधली. त्या उलट इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्र व महिंद्र या आघाडीच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये १८ समभागांमध्ये वाढ, तर १२ मध्ये घसरण दिसून आली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही ०.७१ टक्क्यांची वाढ दिसून आली.

‘टीसीएस’चे बाजार मूल्य १३ लाख कोटींपुढे

बाजारातील तेजीच्या तुफानात मंगळवारी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसच्या (टीसीएस) बाजार मूल्याने १३ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. बाजार अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार मूल्यांकन १३,७१,८२३.७९ कोटी रुपये असून, त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर टीसीएसचे मूल्यांकन हे १३,१४,०५१.०१ कोटी रुपये आहे. मंगळवारच्या व्यवहारात टीसीएसच्या समभागाचे मूल्य २.३२ टक्क्यांनी झेप घेत, ३,५५२.४० रुपयांवर बंद झाले. दिवसाच्या व्यवहारात ते ३,५६०.२५ रुपये असे ५२ सप्ताहातील उच्चांक पातळीवर पोहचले होते.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org