राज्य राखीव पोलीस दल वसाहतीमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प

राज्य राखीव पोलीस दल वसाहतीमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प
बाळे गाव येथील तळावर दरमहा चार टन खत तयार; सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न
डोंबिवली : डोंबिवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर बाळे गावाजवळील महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (तुकडी क्रमांक ११) (एसआरपीएफ) जवानांचा तळ आहे. या तळावर आणि निवासी वसाहतीत तयार होणारा दैनंदिन कचरा, झाडांचा पालापाचोळा यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कचऱ्यापासून दर महिन्याला तीन ते चार टन खत तयार होते.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बळाच्या तुकडी क्रमांक ११चा बाळे गावाजवळ तळ आहे. १७० एकर परिसरात असलेल्या तळावर कार्यालये, निवासी वस्ती, विविध प्रकारची झाडे-झुडपे, घनदाट जंगल आहे. तळ आणि परिसराची नियमित देखभाल तळावरील जवानांकडून केली जाते. येथील निवासी वस्तीमधून दररोज एकूण एक हजार किलो ओला-सुका कचरा तयार होतो. तळावर तयार होणारा कचरा आणि येथील वनसंपदेच्या माध्यमातून तयार होणारा कचरा यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली तर या कचऱ्यापासून खत तयार होऊन त्याचा पुन्हा येथील वनसंपदा संवर्धनासाठी उपयोग होईल, असा विचार ‘एसआरपीएफ’चे बाळे गाव तळाचे कमांडंट संदीप घुगे यांनी केला. तयार खत येथील वृक्षराजीला दिले तर ही वनसंपदा पुन्हा बहरेल. फूल, फळांची वाढ होईल. या विचारातून कमांडंट घुगे यांनी डोंबिवलीतील कचरानिर्मितीचे प्रकल्प उभारून देणारे ‘पीजीआर’ अॅग्रोचे विजय घोडेकर यांच्याशी संपर्क साधला. कचरानिर्मितीचा प्रकल्प अहवाल घोडेकर यांनी ‘एसआरपीएफ’ला दिला. हा आराखडा मान्य झाल्यानंतर सुमारे सात ते आठ लाख रुपये खर्चामध्ये एसआरपीएफ तळावर कचरा खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘पीजीआर’चे घोडेकर, दशरथ निंबारकर यांनी एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या अवधीत प्रकल्पाची तांत्रिक उभारणी केली. जूनपासून पूर्ण क्षमतेने कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू करण्यात आली. तळावर तयार होणारा एक हजार किलो कचरा दररोज खतनिर्मिती प्रकल्पात टाकला जातो.
‘एसआरपीएफ’च्या १७० एकर परिसरात शेकडो टन झाडांचा पालापाचोळा आहे. येथील निवासी वस्तीत ओला-सुका कचरा तयार होतो. या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली तर पुन्हा येथील वनसंपदा फुलविण्यास साहाय्य होईल, हा विचार करून कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला. येथील वनराई अधिक प्रमाणात फुलविली तर त्याचा परिसराला उपयोग होईल. खताचा येथील वनराई फुलविण्यासाठी, परिसरातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी वापर करावा यासाठी प्रयत्न केला जाईल.
– संदीप घुगे, कमांडंट, एसआरपीएफ
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment