करोनापश्चात आजारांवर औषधदानाचा उपक्रम

करोनापश्चात आजारांवर औषधदानाचा उपक्रम
धुळ्यातील संस्थांचा शेकडो रुग्णांना लाभ
धुळे : राज्यात करोनामुक्त झालेला पहिला जिल्हा म्हणजे धुळे. जिल्ह्यास ही मजल मारण्यासाठी प्रशासकीय उपाययोजनांसह विविध घटकांकडून महत्त्वाचे योगदान लाभले. दुसऱ्या लाटेत करोनातून बरे झालेल्यांनाही निरनिराळ्या व्याधींना सामोरे जावे लागले. अशा रुग्णांना मोफत उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळावे, यासाठी जनकल्याण समिती, आयुर्वेद व्यासपीठ आणि जिल्हा आयुर्वेद वैद्य समूह यांनी करोनापश्चात आजारांसाठीचे आयुर्वेदिक उपचार केंद्र उभारले. या केंद्राच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यात काही म्युकरमायकोसिस रुग्णांचाही समावेश आहे.
करोनापश्चात आरोग्य समस्यांना तोंड देणाऱ्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार, मान्यताप्राप्त व प्रभावी औषधे आणि समुपदेशनासह मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने धुळ्यातील आयुर्वेद वैद्य समूहाने नि:शुल्क सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी मे महिन्यात सेवाभावी उपचार केंद्र सुरू करण्यात आले. ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ अशा दोन्ही प्रकारे सेवा देण्यात आली. या उपचार केंद्रासाठी आयुर्वेद व्यासपीठाने सहकार्य उपलब्ध करून दिले. रवी बेलपाठक यांच्या सहकार्याने धुळ्यातील देवपूर पंचवटी टॉवर येथे आयुर्वेदिक उपचार केंद्रासाठी जागा देण्यात आली. या ठिकाणी दररोज करोनातून बरे झालेल्या रुग्णांची तपासणी व उपचार सुरू झाले. धुळ्यातील आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण जोशी यांच्या मार्गदर्शनात प्रभावी उपचारांसाठी ‘कोविडोत्तर आयुर्वेदिक व्यवस्थापन’ तयार करण्यात आले.
मदत कशी?
करोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये विशेषत: कोरडा खोकला, ओला खोकला, थकवा, तोंडाची चव जाणे, गंध न येणे, अंगदुखी, चक्कर, सांधेदुखी, अपचन, वायू, पोटदुखी, मळमळ, अंगाची आग, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, छातीत धडधडणे, नैराश्य, भीती वाटणे, रात्री झोप न येणे, अशी लक्षणे दिसून येत होती. त्यासाठी आयुर्वेदिक औषधींसह पंचकर्म चिकित्सा, आहार, विहार यांचे योग्य मार्गदर्शनही देण्यात आले. केंद्रात महिन्याभरात १०० हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. त्यातील १० रुग्ण म्युकरमायकोसिसचे होते. करोनापश्चात रुग्णांना आयुर्वेदिक उपचार देण्यासह मानसिक आधार देत त्यांना आरोग्याप्रति सजग करण्याचे काम आमच्या केंद्रामार्फत करण्यात आले. धुळ्यातील आयुर्वेदतज्ज्ञांनी यासाठी मोफत सेवा दिली. धुळे शहराप्रमाणेच जिल्ह्यातही असे उपचार केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. – वैद्य जितेश पाठक, धुळे
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment