दुसऱ्या डोसच्या अटीमुळे लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच!

दुसऱ्या डोसच्या अटीमुळे लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच!
मुंबई:येत्या १५ ऑगस्टपासून दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पास देण्यात येणार असून पासधारकांनाच प्रवास करता येणार आहे. एकीकडे मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा मिळाल्यामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना त्यातल्या अटींमुळे आणि लसीकरणाच्या आकडेवारीमुळे मुळात लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या कमीच असल्यामुळे या परवानगीचा लाभ देखील तुलनेनं कमी प्रवाशांना मिळणार आहे.
अटींची आडकाठी आणि प्रवास परवानगीचं वास्तव!
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट घालण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन डोस झाल्यानंतर देखील फक्त महिन्याचा पास घेतलेल्या व्यक्तींनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे तिकीट न घेता अशा पात्र प्रवाशांना थेट महिन्याचा पासच काढावा लागणार आहे. या अशा नियमावलीमुळे लाखो मुंबईकर आणि आसपासच्या ठिकाणाहून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळूनही प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
का करता येणार नाही प्रवास?
नियमानुसार दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, लसीकरणाचा संथ वेग आणि कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यामुळे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या मुळातच कमी आहे. शिवाय, यामध्ये ४५ वरच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे १८ ते ४४ या सर्वाधिक प्रवास करणाऱ्या गटाला प्रवासाच्या परवानगीचा फायदा फारच कमी होणार आहे.
दुसरीकडे ४५ वरच्या व्यक्तींना देखील दोन डोस पूर्ण होऊन देखील तिकीट न मिळता थेट महिन्याभराचा पास काढावा लागणार आहे. त्यामुळे महिन्यातून फक्त काही दिवस किंवा क्वचित महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांना देखील दोन डोस पूर्ण होऊनही पूर्ण महिन्याचा पास काढावा लागेल. यासाठी प्रवासी अनुत्सुक असण्याचीच शक्यता अधिक असल्यामुळे असे प्रवासी देखील लोकल प्रवासापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
एक डोस घेतलेल्यांना परवानगीची मागणी
दरम्यान, संथ लसीकरणामुळे अनेक ठिकाणी एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. विशेषत: कल्याणपुढे कर्जत कसारा अशा ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी एक डोस घेतलेल्यांना परवानगीची मागणी केली जात आहे. “ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग हा शहरी भागाच्या तुलनेत खूप कमी आहे. तेव्हा कसारा, कर्जत, खोपोली अशा दूरच्या उपनगरीय मार्गावरील एक डोस घेतलेल्या लोकांना निदान कल्याणपर्यंत प्रवास करण्याची परवानगी द्यावी. दोन डोस घेतलेल्या लोकांना फक्त पास दिला जाणार आहे. पण जे महिन्यातील फक्त काही दिवस लोकलने प्रवास करणार आहेत अशा लोकांसाठी तिकीट सुविधाही उपलब्ध करून द्यावी”, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment