गणेशोत्सव सजावटीचे साहित्य महाग

गणेशोत्सव सजावटीचे साहित्य महाग
मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या बाजारपेठेवर करोनाचे सावट असले तरी उत्सवासाठी लागणारे सजावट साहित्याच्या दरात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिनी बनावटीच्या रोषणाई माळा, कृत्रीम फुलांचे सजावट साहित्याला दरवर्षी बाजारात मोठी मागणी असते. यंदा चीनहून केवळ ५ ते १० टक्केच माल मुंबई, ठाण्याच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीचा माल विक्रीसाठी दाखल झाला असून मागणी-पुरवठ्यात तफावत दिसू लागल्याने दरातही वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्यामुळे या वस्तूंच्या दरातही वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठा सजल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सजावटीचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे बाजारपेठा रात्री १० वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठा गणेशोत्सवानिमित्त सजल्या असून आकर्षित रोषणाई, कृत्रीम फुलांच्या माला बाजारात दिसत आहेत. यंदा भारतीय बनावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्यासह चीनहून केवळ पाच ते दहा टक्केच सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्यामुळे या वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली असून गेल्यावर्षी ७० ते ८० रुपयांना विक्री करण्यात येणाऱ्या फुलांचे गुच्छ यंदा ८५ ते ९० रुपयांनी विकण्यात येत आहेत, तर ४० रुपये ते १२० रुपयांना विकली जाणारी फुलांची माळ यंदा ५० ते १५० रुपयांना विक्री केली जात आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
उल्हासनगरमधील मखर बाजारपेठ सजली
उल्हासनगर येथील गजानन कपडा बाजाराशेजारी असलेल्या मखर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पुठ्ठ्यापासून तयार केलेले पर्यावरणपूरक मखर यंदा ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत हे मखर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यासह नळजोडणीला लागणारे पाइप आणि रंगीबेरंगी कापड यांच्या साहाय्याने तयार केलेले मखरही यंदा विक्रीसाठी बाजारात आले आहेत. हे मखर दोन हजार रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
इरकल साडीच्या मखरला मागणी
कर्नाटकात इलकल आणि महाराष्ट्रात इरकल साडी म्हणून प्रचलित असलेल्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या मखरांनाही यंदा मागणी आहे. या साड्यांपासून तयार केलेले मखर हे साधे आणि सुटसुटीत असल्याने नागरिक याची खरेदी करत आहेत. साडीवर गणपतीची सुरेख आकृती, आरतींच्या काही ओळी, गणेश मंत्र इत्यादी गोष्टी या साडींवर लिहिलेल्या असतात. मूर्तीच्या बाजूला ठेवण्यात येणाऱ्या उशींनाही साडीपासूनच तयार केलेले कव्हर घातलेले असतात. मूर्तीमागे साडीचा एक मोठा भाग आणि बाजूला साडीचे कव्हर असलेल्या उश्या अशा साध्या मांडणीचे हे मखर नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. अडीच हजार रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यत यांची विक्री केली जात आहे.
मागील वर्षी करोनामुळे दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मखरसह सजावटीच्या साहित्याची विक्री झाली नाही. या वर्षी नागरिकांकडून मखर खरेदीला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. कोणतीही भाववाढ करण्यात आली नसतानाही आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्केच मखरची विक्री झाली आहे. करोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने बहुतांश ग्राहक घरच्या घरीच सजावट करत आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment