नारायण राणेंना अटक होणार?; नाशिक पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. दरम्यान महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाडमध्येही गुन्हा दाखल
युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहराचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि करोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह १०० ते १२५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नारायण राणेंचं नेमकं वक्तव्य काय –
नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.
“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा