दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भूमिका

दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भूमिका
नांदेड : विद्यापीठासह महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत ऑफलाईन महाविद्यालये सुरू होतील; परंतु लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडील उपलब्ध लशींमधून ३० टक्के कुप्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.
सामंत म्हणाले,की राज्यात एकूण ४२ लाख विद्यार्थी उच्च व तंत्रशिक्षण घेत आहेत. करोनामुळे ऑनलाईन सुरू असलेले वर्ग आता ऑफलाईन सुरू होऊ शकतील. त्यामुळे यासाठी तयारी सुरू आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध लशींमधून ३० टक्के लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमधून हा प्रयोग सुरू केला जाणार असून यंत्रणेने आदर्श पद्धतीने हा प्रयोग राबवावा. त्यानंतर या प्रयोगाची अंमलबजावणी केली जाईल.
अण्णा भाऊंच्या नावे अध्यासन केंद्र
नांदेडमधील अध्यापक महाविद्यालयाला जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात काम सुरू केले जाणार आहे. नांदेड येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासंदर्भात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती सामंत यांनी त्यांच्या मागील दौऱ्यात दिली होती. आता यासंदर्भातील काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन-तीन दिवसांत माझी स्वाक्षरी झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल. त्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सामंत यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यासाठी सामंत बुधवारी सायंकाळी येथे दाखल झाले होते.
३ हजार ७४ प्राध्यापकांच्या पदांना मंजुरी
प्राध्यापकांबरोबरच काही प्राचार्यांचीही पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर २६० प्राध्यापकांची राज्यभरात भरती करण्यात आली असून एकूण ३०७४ पदांना मंजुरी देण्यात आली आहे; परंतु अर्थमंत्रालयाने यासंदर्भात भरती प्रक्रिया काही काळ थांबविण्याची मागणी केली असल्याने ती तात्पुरती थांबविण्यात आली असली तरी अर्थमंत्रालयाच्या परवानगीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध लशींमधून ३० टक्के लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमधून हा प्रयोग सुरू करण्यात येईल. – उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment