इंधन दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ


इंधन दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ
Advertisement

इंधन दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ


 पेण: गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा २२ लाख गणेश मूर्ती देशभरात रवाना झाल्या आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेश मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि परदेशातूनही मागणी होत असते. पेणमध्ये गणपती बनवणारे ४५० लहानमोठय़ा कार्यशाळा आहेत. दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० लाख गणेश मूर्ती बनवल्या जातात. त्यांच्या देश-परदेशातील विक्रीतून जवळपास ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते. या वर्षीदेखील पेणमधून २२ लाख गणेशमूर्ती देश आणि परदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

दरवर्षी गणेश मूर्तीच्या किमतींमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. यावर्षी मात्र ही दरवाढ २५  टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. याचा परिणाम गणेश मूर्तीच्या किमतींवर झाला आहे. गणेश मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग यांसारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचाही काही प्रमाणात फटका या व्यवसायाला बसला. जवळपास तीन महिने मूर्ती बनवण्याचे काम रखडले होते. त्यानंतर मे महिन्यात कामाला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात झाली. पण जून-जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा पुन्हा एकदा गणेशमूर्ती व्यवसायाला फटका बसला. हमरापूर आणि जोहे परिसरातील गणेश मूर्तिकारांच्या चित्रशाळा पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे गणेश मूर्तीचे नुकसान झाले. व्यावसायिकांना यंदाही कुशल कारागिरांची कमतरता जाणवली. चांगली मजुरी देऊनही कारागीर मिळत नव्हते. मात्र सर्व संकटांवर मात करत मूर्तिकारांनी गणेश मूर्तीचे काम वेळेत पूर्ण केले आहे. देशभरात पेणमधून गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.

लहान मूर्ती बनविण्याकडे कल

गेल्या वर्षी शासनाच्या निर्बंधांमुळे मोठय़ा गणेश मूर्तीना फारसा उठाव मिळाला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन मूर्तिकारांनी यंदा दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती तयार करण्यावर भर दिला होता. या वर्षीही गणेशोत्सवावर करोनाचे सावट कायम असल्याने मूर्तिकारांनी विशेष खबरदारी घेतली आहे. २३०हून अधिक प्रकारच्या सुबक आणि सुंदर गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

शाडूच्या गणेश मूर्तीना अधिक मागणी

केंद्रीय प्रदुषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील घातलेली बंदी तात्पुरती उठवली आहे. त्यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीपेक्षा यंदा शाडूच्या गणेश मूर्तीना जास्त मागणी होत आहे.

या वर्षी पेण शहरात तयार झालेल्या ४० टक्के मूर्ती या शाडूच्या आहेत. एक ते दीड फुटांच्या शाडूच्या मूर्तीची जास्त प्रमाणात विक्री होत असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.

मूर्तीची परदेशवारी

गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पेणच्या गणेश मूर्तीना फारशी मागणी नव्हती. यंदा मात्र परदेशातूनही चांगली मागणी नोंदविण्यात आली होती. पेणमधून दरवर्षी अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, मॉरिशस आणि दुबई येथे गणेश मूर्ती मोठय़ा संख्येने पाठविल्या जातात. या वर्षीही जवळपास २० हजार गणेश मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. यंदा परदेशातूनही मातीच्या गणेश मूर्तीना मागणी वाढल्याचे मूर्तिकार सांगतात.

दरवर्षी गणेश मूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असते. मात्र यंदा इंधनाचे दर खूप वाढले आहेत, त्यामुळे वाहतूक खर्च मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा गणेश मूर्तीच्या किमतीत २५ टक्के वाढ होणार आहे.

 – श्रीकांत देवधर, अध्यक्ष, पेण गणेश मूर्तिकार संघटना

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments