वृद्ध महिला-पुरुषांना गावाच्या चौकात बांधून मारहाण


वृद्ध महिला-पुरुषांना गावाच्या चौकात बांधून मारहाण

वृद्ध महिला-पुरुषांना गावाच्या चौकात बांधून मारहाण

संपूर्ण गाव मूकसाक्षीदार, सात जण जखमी, १३ जणांना अटक; भानामती व जादूटोण्याचा संशय

चंद्रपूर : वैज्ञानिक युगात अंधश्रद्धा, भूतबाधा, भानामती, जादूटोणा असले प्रकार आजही ग्रामीण भागात सुरू आहेत. त्यातून मारहाण, हत्या, नरबळी देण्याच्या घटना सातत्याने समाजात घडत असल्याचे दिसत आहे. अशीच काहीसी काळीमा फासणारी घटना शनिवारी महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावात घडली. भानामती व जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिला व पुरुषांना भर चौकात हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी व तेवढय़ाच संतापजनक या घटनेत एकूण सात जण जखमी झाले. जखमींवर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना उघडकीस येऊ नये यासाठी पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मारहाणीच्या या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये एकनाथ नारायण हुके (७०), साहेबराव एकनाथ हुके(४८), प्रयागबाई एकनाथ हुके (६४), शांताबाई भगवान कांबळे (५३), शिवराज पांडुरंग कांबळे (७४) यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. जिवती या तालुक्याच्या ठिकाणाहून १२ कि.मी. अंतरावर वणी खुर्द हे पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. काही दिवसांपासून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून एकाच समाजाच्या दोन गटात आपसात वादविवाद, भांडण, मारहाण सुरू आहे. मोहरमच्या दिवशी अचानक गावातील तीन-चार माहिलांच्या अंगात देवी शिरली अन् वृद्ध महिला-पुरुषांची नावे घेत जादूटोणा केल्याचे सांगितले. त्याला बळी पडलेल्या काहींनी गावातील चौकात खांबाला बांधून हुके व कांबळे कुटुंबातील महिला व पुरुषांना मारहाण केली. हा सगळा प्रकार गावातील सर्व नागरिक  बघत होते. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जिवतीचे ठाणेदार संतोष अंबिके पथकासह गावात दाखल झाले. याप्रकरणी आतापर्यंत चौकशी करून १३ जणांना अटक करण्यात आली. मारहाण करणारे आणि पीडित कुटुंब एकाच समाजाचे आहेत.

खासदार बाळू धानोरकर यांनी या घटनेत जखमी वृद्ध महिला व पुरुषांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत आस्थेने विचारपूस केली. तसेच आरोपींवर ठोस कारवाईचे आश्वासन दिले. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. गावात सध्या शांततेचे वातावरण आहे. १३ आरोपी अटकेत आहे. उर्वरित आरोपींसाठी तपास सुरू आहे. गावातील नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेवू नये, असे काही आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी केले आहे

दरम्यान, या घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. अशी घटना घडू नये यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. पुढील अधिवेशनात अशा विषयावर सविस्तर चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

याप्रकरणी जनजागरण करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तशी मागणी करणार आहे. ज्या गावात अशा घटना घडतात तिथे अधिक प्रभावीपणे जनजागरणाची मोहीम राबवणे आवश्यक आहे. केवळ जिवती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची गावे शोधून ही मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या गावाला लवकरच भेट देऊन सर्वाना शांततेचे आवाहन करणार आहे. भानामाती हा प्रकारच नाही याचीही माहिती ग्रामस्थांना देणार आहे, असे आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले आहे.

जखमींची गावात जाण्याची भीती व दहशत

भानामती व जादूटोण्याच्या संशयावरून गावातील चौकात बांधून अमानुष मारहाण करणाऱ्या पाच जणांना चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र या पाचही जखमींच्या चेहऱ्यावर भीती व दहशतीचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे वाईट काम केले नसताना ग्रामस्थांनी अतिशय अमानुषपणे मारहाण केली. हा प्रकार अतिशय दुर्दैवी होता, असे हे पाचही जण सांगत आहेत. आम्ही कुठलाही गुन्हा केला नसताना ग्रामस्थांनी आम्हाला अतिशय अमानुषपणे बेदम मारहाण केली. आमच्या घरात, किंवा इतर कुठेही अशा प्रकारे जादूटोणा किंवा भानामातीचे प्रकार केले जात नाही. गरिबीत आम्ही सुखाने आयुष्य जगत असताना, केवळ संशयातून हा प्रकार घडला. मागील अनेक दिवसांपासून त्रास देणे सुरू होते, मात्र शनिवारी कळस गाठला व मारहाण केली. आता गावात जाण्यास भीती वाटते, गावकरी आमचा जीव घेईल, अशी भीती व दहशत वाटत आहे, असे या जखमींनी सांगितले.

वणी खुर्द गावाला भेट देऊन दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. जादूटोणा कायद्याबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे सुरू आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील तसेच इतरांची संयुक्त बैठक आयोजित करून त्यांना योग्य समुपदेशन करण्यात आले आहे. सध्या गावात शांतता असून गुन्हय़ाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तथा जिवतीचे प्रभारी ठाणेदार संतोष अंबिके करीत आहे.

– अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments