ओबीसींचा इंपिरिकल डेटा मिळविण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी
ओबीसींचा इंपिरिकल डेटा मिळविण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंदराव निरगुडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली मागणी
सदरचे निवेदन ओबीसी जनमोर्चाच्यावतीने आयोगाला सादर करण्यात आले असल्याची ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांची माहीती
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत नजीकच्या काळात संपत आहे. त्यामुळे ओबीसींचा इंपीरिकल डेटा लवकरात लवकर मिळवून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुर्नस्थापित करणेबाबत कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी ओबीसी जनमोर्चातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंदराव निरगुडे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन ओबीसी जनमोर्चाचे वतीने आयोगाला सादर करण्यात आले असल्याची माहिती ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी दिली.
ओबीसींचा इंपीरिकल डेटा आणि ओबीसींच्या विविध प्रश्नाबाबत ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंदराव निरगुडे यांच्या समवेत बुधवारी पुणे येथे पार पडली. या बैठकीत श्री. निरगुडे यांनी राज्यातील माहिती गोळा करण्यासाठी सर्व तालुक्यातून प्रत्येकी तीन ते चार प्रतिनिधी संघटनेने द्यावेत असे आवाहन केल्याचे बावकर यांनी सांगितले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे वतीने आपल्या यंत्रणेमार्फत इंपरिकल डेटा लवकरात लवकर मिळविण्यात यावा. त्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक सरकारने अवलंबलेली कार्यपद्धती अवंलबिण्यात यावी. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या सव्हेक्षणाबरोबरच राज्यपातळीवर जातनिहाय जनगणना करण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा. त्याचबरोबर आयोगाकडे प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा कालानुक्रमाने निपटारा करण्यात यावा. तसेच संभाव्य ओबीसी जातींच्या ढोबळ माहितीचा इंपिरिकल डेटामध्ये विचार व्हावा आणि सर्व स्थानिक संस्थांमध्ये ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली.
तर या बैठकीत आनंदराव निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली आयोगाकडून ओबीसी, भटके-विमुक्त, विशेष मागासवर्ग, बलुतेदार आदि समाज घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा ओबीसी जनमोर्चाचे वतीने करण्यात आली.
या बैठकीला ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, दशरथ दादा पाटील, मृणाल ढोले पाटील, संदेश मयेकर, अरविंद डाफळे, दिगंबर लोहार, कृष्णा वणे, मंगेश ससाणे, सरचिटणीस व समन्वयक माधव कांबळे, महादेव मेंगे, सुहास काशिद, हरिभाऊ घाणेकर, मंगेश हमणे, बजरंग गडदे, विठ्ठल चोपडे, धोंडीराम जावळे, गोविंद कोरवी आदी ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी राज्यभरातून उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा