वेळेच्या बंधनाने बाजारात आलेला शेतमाल विकायचा कसा; माल राहतो शिल्लक
मार्केट यार्ड - दुपारी चारपर्यंतच्या वेळेच्या मर्यादेमुळे मार्केट यार्डातील (Market Yard) घाऊक आणि किरकोळ बाजारातील खरेदी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. एकीकडे सरकार शेतीविषयक कामांना परवानगी देत आहे, तर दुसरीकडे बाजारात आलेला माल (Agriculture Goods) विकण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. त्यामुळे बाजारात आलेला माल विकायचा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. (How to Sell a Commodity Market Time Constraints Balance Goods Remains)
पालेभाज्या व फळभाज्या हा नाशवंत माल आहे. तर फळे, भुसार मालाची खरेदीत ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून करायचे तरी काय, असा प्रश्न किरकोळ विक्रेते करीत आहेत. वेळेत खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे. ग्राहकांअभावी विक्रेत्यांनी मालाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील बाजारात मोठ्या प्रमाणात माल शिल्लक रहात आहे. परिणामी दर घटले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
हेही वाचा: अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; अधिसूचना जाहीर
विक्रीसाठी वेळ वाढवून मिळावा : घुलेफळभाज्या व पालेभाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. शेतकऱ्यांना माल वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, किरकोळ बाजारात भाजी विकण्यास दुपारी चारपर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे. भाजीपाल्याची विक्री विशेषतः सायंकाळी जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे किमान भाजीपाला विकण्यास सायंकाळी सातपर्यंत परवानगी दिली पाहिजे. घाऊक बाजारातून भाजीपाला खरेदी करून चारच्या आत विकणे किरकोळ विक्रेत्यांना अवघड जात आहे. त्यामुळे ते कमी प्रमाणात माल खरेदी करत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील मालाची विक्री कमी झाली आहे, असे मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.

Comments
Post a Comment