चिपळुनात महापूर, भयानक परिस्थिती, नागरिक पुरात अडकले, मदतीसाठी टाहो, २६ जुलै २००५ पेक्षा भीषण परिस्थिती, चिपळुनात वाहने अडकली
चिपळुनात महापूर, भयानक परिस्थिती, नागरिक पुरात अडकले, मदतीसाठी टाहो, २६ जुलै २००५ पेक्षा भीषण परिस्थिती, चिपळुनात वाहने अडकली
चिपळूण:-गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तर बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिपळुनात २६ जुलै २००५ पेक्षा २२ रोजी भयानक परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे संपूर्ण चिपळूण बाजारपेठेसह चिपळूण शहर पुराच्या पाण्याखाली गेले. याचबरोबर खेर्डी गावातदेखील जलमय परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत तर घराघरांत पुराचे पाणी शिरले होते. वाहने पाण्याखाली गेली. जुन्या बाजारपुलासह नवीन बाजारपुल पाण्याखाली गेला. तसेच कधी नव्हे तर महामार्गाच्या परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत व घरांत पाणी शिरल्याचे पहावयास मिळाले. एकंदरीत चिपळूण बाजारपेठ, मिरजोळी व खेर्डीशी अन्य परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला. पुराच्या पाण्यात अडकलेले नागरिक सुरक्षिततेसाठी टाहो फोडत होते. मात्र, भयानक पुरामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या पुरामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे कधी नव्हे यावेळी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे चिपळूणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या वर्षी जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. नंतर हा पाऊस सातत्याने पडत होता. फक्त काही दिवसांपूर्वी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. पावसाने नंतर दमदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे उरकली. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला. तोपर्यंत पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार पडतच होता. परंतु, बुधवारी रात्री सुसाट्याच्या वाऱ्यासह ढगफुटीमुळे रात्रभर पाऊस पडत होता अन वाशिष्टीसह शिवनदीच्या पातळीत हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. या कालावधीत नागरिक झोपेत होते. मात्र, काही जागरूक नागरिकांच्या चिपळुनात पूर भरला आहे हे लक्षात आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन काही नागरिक सुरक्षितस्थळी गेले. काहींनी आपली वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र, काहींची वाहने तिथेच राहिल्याने पुराच्या पाण्यात सापडली.वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हळूहळू जुन्या बाजारपुलासह नवीन बाजारपुलावरून पाणी गेले आणि ते पाणी या परिसरात शिरले. यामुळे चिपळूण बाजारपेठेशी पलिकडील भागाचा संपर्क तुटला. इतकेच नव्हे तर पुराच्या पाण्याने चिपळूण बाजारपेठेला वेढा घातला. तर संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. या बाजारपेठेत किमान १० फूट पाणी गेले. ही परिस्थिती पाहता चिपळूण बाजारपेठेतील प्रत्येक दुकानांत पाणी गेले. यामुळे दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. धवल मार्टचा तळमजला पाण्याखाली गेल्याने आतील किराणा व अन्य मालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतांना आता पुरामुळे पूर्णतः मोडला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता जगायचे कसे? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर पडला आहे.चिपळूण बाजारपेठेसह, चिंचनाका, भोगाळे, विरेशवर तलाव परिसर, मध्यवर्ती बस स्थानक, मुरादपुर, शंकरवाडी, मार्कडी, अनंत आईस फेक्ट्री परिसर, इंदिरा गांधी सांस्कृतिक, मेहता पेट्रोल पंप, साई मंदिर परिसर, परशुराम नगर, काविळतळी, वडार कॉलनी, राधाकृष्ण नगर असा एकंदरीत बहादुरशेखनाका परिसरापर्यंत पुराचे पाणी आले होते. चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुरादपूर रोडवर व परिसरात पाणी साचल्याने रेल्वेकडे जाण्याचा संपर्क तुटला. इतकेच नव्हे तर येथील नागरिक आपापल्या घरी अडकून पडले.याचबरोबर बहादुरशेखनाका परिसरातच पाणी साचायचे. मात्र, यावेळी महामार्गावरील रेडीज पेट्रोल पंपापर्यंत पाणी आले. या मार्गावरील दुचाकीसह अवजड वाहने पाण्याखाली गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.तर दुसरीकडे चिपळूण नगर परिषदेपासून खेंड जाखमाता मंदिर परिसरापासून खेंड बावशेवाडी, कोलेखाजण रोड याचबरोबर कधी नव्हे ते देसाई बाजारपर्यंतच्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने चिपळूण-गुहागर मार्गाशी संपर्क तुटला. खेंड बावशेवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात तर इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले. यामुळे खेंड बावशेवाडी येथील साई सिद्धी इमारतीमध्ये कुळे यांच्या घरातील १० लोक अडकले. ही सर्व माणसे सुरक्षिततेसाठी मदतीची याचना करीत होते.वाशिष्टी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिपळूण बाजारपुलावरून पाणी गेले अन पेठमाप, गोवळकोटरोड येथील सर्वच परिसरात पुराचे पाणीच पाणी झाले होते. या परिसरातील घरे, वाहने पाण्याखाली गेली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ओतारी गल्ली येथील घरे पाण्याखाली गेली. येथील रहिवासी टेरेसवर गेली आणि सर्व घाबरून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रंजिता ओतारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली.या वर्षी पुराची परिस्थिती भयानक ! चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली होतीच तर महामार्गापर्यंतच्या परिसरापर्यंत पाणी आले. यामुळे या ठिकाणच्या इमारतींखाली तसेच घरांमष्ये पाणी गेले. या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. पुरात अडकलेले नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘मदत, मदत करा, असा टाहो फोडत होते’. मात्र, आपत्कालीन पथके कुठे आढळून आली नाहीत. तर बघ्या नागरिकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस ठिक ठिकाणी तैनात होते.चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक पाण्याखाली गेले. यामुळे येथील वाहने पॉवर हाऊस, महामार्ग परिसर तसेच शिवाजी नगर बस स्थानकात उभी करण्यात आली. याचबरोबर खाजगी वाहनेदेखील महामार्गावर उभी करण्यात आली. तर मुंबई अथवा रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठीच रांग पहावयास मिळाली. यामुळे प्रवाशांना ग्रास सहन करावा लागला. यावेळी दिलीप आंबरे यांनी प्रवाशांना खाऊ वाटप केला.
चिपळूण शहरासह खेर्डीतदेखील पूर भरला. खेर्डी माळेवाडी तर पाण्याखाली गेली. येथील नागरिक मदतीसाठी याचना करीत होते. खेर्डीत देखील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत तर घरांमध्ये पाणी गेले. यामुळे खेर्डीत देखील परिस्थिती गंभीर होती. कळबसते येथील परिस्थितीदेखील विदारक होती. बहादुरशेख नाका परिसरात पाणी असल्याने कळबसते व पंधरागावशी संपर्क तुटला.बहादुरशेखनाका येथून वाशिष्टी नदी तुडुंब भरून वाहत होती. येथील परिसर जलमय झाला. एकंदरीत चिपळुनात सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळाले. ग्रामीण भागातही नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. शेतांमध्ये पाणी साचले. यामुळे शेतीचेजी नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे चिपळूणतील धरणे ओव्हरफ्लो झाली.
चिपळूण शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे पाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाला. या परिस्थितीवर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती. मात्र, अतिपुरामुळे प्रशासन हतबल झाले. तर आमदार शेखर निकम चिपळुनात तळ ठोकून होते.पुराची परिस्थिती काही तास होती. काविळतळी येथील जिव्हाळा मार्टमध्ये पाणी शिरल्याने आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस वसाहतीच्या इमारतींच्या स्टील पार्किंगमध्ये पाणी आले. यामुळे पोलीसच असुरक्षित झाल्याचे पहावयास मिळाले.कळबसते येथे काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे घरात १२ माणसे अडकली आहेत. या लोकांचा जीव टांगणीला आहे. ही लोकं मदतीची याचना करीत आहेत.कळबसते -धामणद रोडवर अडीच फूट पाणी आले. एकंदरीत कळबसते गाव देखील पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. सर्वत्र भयाण परिस्थिती आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment