ऊसाचे बिले जमा न केल्यास आत्महत्या करु, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा





 लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठणतालुक्यातील लोहगाव, आपेगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाच महिन्यांपूर्वी गाळप केलेल्या ऊसाचे बिले एस.जे.शुगर (रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक) कारखान्याने S.J.Sugar Mill अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्याने ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दहा दिवसांत पैसे जमा न केल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेने साखर उपसंचालक, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.अन्नदाता शेतकरी संघटना अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी, शेतकरी पवन औटे, राजू रूपेकर, वसंत जगताप आदी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, साखर आयुक्त पुणे, साखर उपसंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव Malagaon तालुक्यातील एस.जे.शुगर, रावळगाव या साखर कारखान्याने Aurangabad लोहगाव, आपेगाव येथील शेकडो उस उत्पादक शेतकऱ्यांचा हजारो टन ऊस फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तोडून नेला असुन अद्याप एफआरपीनुसार बिले दिली नाही. फक्त आश्वासन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी Farmer परेशान झालेला असून खरीप हंगामात बी-खते भरणा करण्यासाठी पैशाची गरज असताना हातात पैसे नसल्याने आम्ही हवालदिल होऊन आर्थिक अडचणीने मनस्थिती बिघडली आहे. जर दहा दिवसांत आम्हाला बिल नाही मिळाले तर सामुदायिक आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने अन्नदाता संघटनेच्या ई-मेल निवेदनाची दखल घेतली असुन आपली तक्रार पुढील कार्यवाहीसाठी सहकार विभागास पाठविण्यात आल्याचे शेतकऱ्यांना कळविले आहे.

Comments