“गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे”, संजय राऊत भाजपावर संतापले




विरोधी पक्षाकडून होणारे अनेक हल्ले फुसके बार आहेत, संजय राऊतांची टीका

गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. सरकारने यासाठी आता रणनीती आखण्याची गरज आहे असं मत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचे संकेत दिले आहेत. 

“मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सरकारने रणनीती आखण्याची गरज

“एकतर्फी हल्ले होत असून चुकीचे आरोप केले जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून प्रसारमाध्यमांचा वापर केला जात आहे. खोट्या आणि बनावट गोष्टीसुद्धा खऱ्या म्हणून समोर आणल्या जात आहेत. गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. आणि त्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. 

एक पाऊल पुढे टाकावं लागेल

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा हे एकमेव हत्यार आहे. आरोप खोटे, बनावट असतील तर त्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा मजबूत आणि निष्पक्ष आहे. केंद्रात भाजपाचं सरकार असल्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांना त्रास देणं हीच एक ताकद त्यांच्या हातात आहे. कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी उघड होतंच. असत्य तरंगून शेवटी वर येतं. या सर्वांशी लढण्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकावं लागेल,” असा निर्धारच संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे “शिवसेनेला दिलेला शब्द जर त्यावेळी भाजपाने पाळला असता तर कदाचित उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती हे आम्ही वारंवार सांगत आहोत. त्याबद्दल खंत किंवा खेद वाटण्याचं कारण नाही. आम्ही तिघांनी मिळून आता मार्ग स्वीकारला असून व्यवस्था तयार केली आहे आणि ती पुढे नेणं कटिबद्धता आहे,” असं यावेळी ते म्हणाले.


Comments