सोलापूर जिल्ह्यातील 34 सराईत गुन्हेगारांना लावणार मोक्का !
सोलापूर : चोरी, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यांतील चार प्रस्तावांतील 34 सराईत गुन्हेगारांना मोक्का लावण्यास विशेष पोलिस महासंचालकांनी मान्यता दिली आहे, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. टेंभुर्णी, पांगरी, वैराग, नातेपुते आदी ठिकाणी झालेल्या घटनांमधील गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. मोक्का लावण्यासंदर्भातील आणखीन तीन प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत, असेही सातपुते यांनी या वेळी सांगितले. (Three thousand policemen will be deployed for Ashadhi Wari)
आषाढी वारीसाठी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. या वारीसाठी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पायी वारीसंदर्भात बंदोबस्ताची फेररचना केली जात आहे. इसबावी ते पंढरपूर या पालखी मार्गावर पुरेसे सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यासाठी पालख्यांना परवानगी देण्यात येणार आहे. प्रत्येक पालखीसोबत दोन वारकरी तर उर्वरित वारकरी वाहनांमधून जाणार आहेत. या वारीसाठी पंढरपूरच्या आसपासच्या 10 गावांमध्ये 17 ते 24 जुलै या कालावधीत संचारबंदी लावण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

Comments
Post a Comment