यंदा मान्सून समाधानकारक; सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज




 यंदा मान्सून समाधानकारक; सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज



 मुंबई:-येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. सन २०२१ मध्ये सरासरीच्या १०३ टक्के (+/- ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या काळात यंदा ९०७ मिलिमीटर पाऊस पडू शकेल. स्कायमेटने जानेवारीमध्ये वर्तवलेल्या अंदाजामध्येही यंदा पाऊस सरसरीइतका पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्या संदर्भात मंगळवारी अधिक माहिती देण्यात आली. येत्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल. कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ला निना स्थिती मान्सून काळामध्ये तटस्थ असेल असा अंदाज स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी वर्तवला. मान्सूनच्या मध्यावर एन्सोचा प्रभाव वाढेल. मध्य प्रशांत महासागराचे तापमान थंड होऊ लागेल. मात्र, हा परिणाम फार मोठा नसेल. त्यामुळे मान्सूनदरम्यान एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.इंडियन ओशन डायपोल तटस्थ असून, याचाही फारसा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही अशी शक्यता आहे. मान्सूनवर मेडन-ज्युलिअन ऑस्सिलेशन (एमजेओ) या घटकाचाही प्रभाव असतो. मात्र, सध्या या संदर्भात कोणतेही भाष्य करता येणार नसल्याचे स्कायमेटकडून सांगण्यात आले.


यंदाच्या पावसाळ्यासाठीचे अंदाज


- अतिरिक्त पावसाची १० टक्के शक्यता (ऋतूमध्ये ११० टक्क्यांहून अधिक पाऊस)

- सरासरीहून अधिक पावसाची १५ टक्के शक्यता (ऋतूमध्ये १०५ ते ११० टक्के पाऊस)

- सरासरीइतक्या पावसाची ६० टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९६ ते १०४ टक्के पाऊस)

- सरासरीहून कमी पावसाची १५ टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९० ते ९५ टक्के पाऊस)

- दुष्काळाची शून्य टक्के शक्यता (ऋतूमध्ये ९० टक्क्यांहून कमी पाऊस)


महिनानिहाय पाऊसाचा अंदाज


- जून :सरासरीच्या १०६ टक्के

- जुलै : सरासरीच्या ९७ टक्के

- ऑगस्ट : सरासरीच्या ९९ टक्के

- सप्टेंबर : सरासरीच्या ११६ टक्के




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments