मेडिकल स्टोअरच्या पायरीवर रुग्णाचा मृत्यू!; कोविड रुग्णालय गाठण्याआधीच...




मेडिकल स्टोअरच्या पायरीवर रुग्णाचा मृत्यू!; कोविड रुग्णालय गाठण्याआधीच...



यवतमाळ:-यवतमाळ शहरात करोना सदृष्य लक्षणे असलेल्या एका रुग्णाचा औषधे घेत असताना औषध दुकानाच्या पायरीवरच तब्येत खालावून अचानकपणे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे दृश्य पाहून तिथे असलेले सारेच हादरून गेले.यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार नजीकच्या हातगाव येथील मारोतराव शेळके (५९) हे गावातील आनंद व्यवहारे या युवकासोबत तपासणीसाठी यवतमाळ येथील डॉ. अरुण जनबंधू यांच्याकडे आले होते. तपासणी केल्यानंतर त्यांचा एचआरसीटी स्कोअर १४ आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना तत्काळ करोना संदर्भात उपचारार्थ कोणत्या तरी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यांना काही औषधेही लिहून दिली. त्यानंतर मारोतराव शेळके दवाखान्यालगतच्या नरेश मेडिकल स्टोअरमध्ये गेले. तिथे औषधांची रक्कम किती होईल, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ४ हजार ५०० रुपये बिल होईल असे सांगण्यात आले. मात्र, तेवढे पैसे जवळ नसल्याने त्यांनी अर्धीच औषधे मागितली. त्यानुसार दुकानदार औषधे काढत होता. थोडा वेळ लागेल हे पाहून मारोतराव हे तिथल्या पायरीवर बसले आणि काही क्षणांतच ते निपचित पडले. त्यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे लक्षात आले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या सोबत आलेल्या आनंद व्यवहारे यांच्यावर तर या घटनेने मोठा आघात झाला. मारोतराव यांच्या सीटी स्कॅन अहवालावरून त्यांना करोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसत होते. मात्र करोनाची अन्य चाचणी त्यांनी केली नव्हती. त्यामुळे त्यांचा मृत्यू अचानकपणे नेमका कसा झाला, हे कोडेच आहे. तरीही करोनाचा संसर्ग व तणावाने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अवधूतवाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.'मारोतराव शेळके हे आजारी असल्याने त्यांचे उपचार डॉ. अरुण जनबंधू यांच्याकडे सुरू होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर शेळके यांना सर्व लक्षणे ही करोनाची दिसत होती. त्यांचा एचआरसीटी स्कोअर १४ होता. तसेच त्यांची प्राणवायूची पातळीही कमी झाली होती. त्यामुळे तपासणीनंतर त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला तपासणी करणारे डॉ. अरुण जनबंधू यांनी दिला होता. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला', अशी माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली. शेळके यांचा मुलगा नागपूर जिल्ह्यात पोलीस विभागात कार्यरत आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments