वडगांव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पेठवडगाव (श्री.सुशांत दबडे)-
येथील वडगांव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (वय ५५,रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
काही दिवसांपूर्वीच पदोन्नतीवर वडगांव पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या भोसले यांना लाच घेताना पकडल्याने पोलीस दलात खळबळ माजली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता संशयित आरोपींकडून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, हेड.कॉ. शरद पोरे यांनी चंद्रकांत भोसले याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे लाच घेऊन पाकिटाल अतिरिक्त वजन वाढवू पाहणाऱ्या पोलिसांवर लाचलुचत विभागाची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
गेल्या महिन्यात एका विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासरा यांच्या विरोधात वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, संशयित आरोपींकडून मदत करतो म्हणून पाच हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले याने मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार झाल्याचे उजेडात आले.

Comments
Post a Comment