नियतीचा खेळ सारा; लेकराच्या गाडीवरुन पडण्याच निमित्त,आईवर ओढवला मृत्यु

 संगमेश्‍वर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोनवी पुलाजवळील माभळे येथील गतिरोधकावर दुचाकीवरुन प्रवास करणारी महिला तोल जावून पडल्याने महिला ठार झाली. सुवर्णा सुरेश गोटल (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून अपघात शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.खेड तालुक्‍यातील आवाशी येथील अक्षय व भाऊ श्रीकांत हे दोघे भाऊ दुचाकीने लांजा येते जात होते. अक्षयने त्याच्या मित्राची गाडी घेतली होती. प्रवासामध्ये अक्षयने आपल्या दुचाकीच्या पाठीमागे आई सुवर्णा हिला घेतले होते. खेड येथून निघालेल्या अक्षय आईला घेवून संगमेश्‍वर सोनवी पुलाच्या पुढे माभळे येथे गतिरोधकाजवळ सकाळी ९.१५ वा.आला असता त्याच्या मागे बसलेली आई सुवर्णा हिचा तोल गेल्याने ती रस्त्याच्या मध्यभागी उजव्या बाजूला तोल जावून पडली.गाडीवरुन खाली पडल्याने तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. श्रीकांत हा त्यांच्या पाठीमागून येत होता. तो तेथे आला असता अपघातात आईला गंभीर इजा झालेली पाहून त्याने व अक्षयने आईला रिक्षाने उपचारासाठी संगमेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने तिला संगमेश्‍वर येथे प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. अक्षय, श्रीकांत आणि आई सुवर्णा हे तिघेजण कार्यासाठी लांजा येथे निघाले होते. ते संगमेश्‍वर येथे आले असता हा अपघात घडला. सुवर्णा गाडीवरुन खाली पडली, तेव्हा ग्रामस्थांनी तिचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केला. तसेच महामार्गावरुन येणाऱ्या गाड्यांना तत्काळ थांबविले. मात्र दुर्दैवाने पाठ सोडली नाही. तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर पोलिस संतोष झापडेकर, कांबळे यांना मिळताच त्यांनी पंचनामा केला.

Comments