⚪‘देव’ आला धावून!
त्याचं असं आहे की, माणूस जसाजसा मोठा होत जाणार तशी त्याच्या नकाराची कारणंही मोठीच असणार ना! आता रजनीकांत काय ‘माझं पोट दुखतं म्हणून राजकारणात येणार नाही’ असं थोडीच सांगणार? तसं सांगायला तो काही शाळकरी मुलगा थोडीच आहे. या काळाचा महान सुपरस्टार आहे तो. दाक्षिणात्यांनी देवत्व बहाल केलंय त्याला. आता, अशा मोठय़ा माणसाच्या मदतीला देव नाही तर आणखी कोण धावून येणार? तसाही देव संकटात असलेल्या प्रत्येक लहानथोरांच्या मदतीला धावून येतोच असे म्हणतात. रजनीसाठी तो अगदी योग्य वेळेवर आला. यावर- आतला आवाज व देव यांत काय फरक आहे, असले निर्थक प्रश्न विचारू नका. भलेही तुम्ही द्रविडी असाल तरी! अनेकांच्या दृष्टीने आतला आवाज व देव एकच असतो. फक्त सांगण्या-सांगण्यातच काय तो फरक. आपल्याकडे महात्मा गांधींनी हा आतला आवाज लोकप्रिय केला. त्यांना माघार घ्यायची असली की ते तेच म्हणायचे. नंतर सोनिया गांधींनीसुद्धा ‘अंतरात्मा की आवाज’ म्हणून चक्क पंतप्रधानपद नाकारले. रजनीनं ‘दैवी संकेत’ असा शब्द वापरला. पण काळानुरूप एवढा बदल तर होणारच ना! आता या स्टारच्या स्वप्नात खरंच देव आला की दिल्लीचा चाणक्य, हे मात्र कधीच कळणार नाही. कारण अंतर्मनातला खरा झगडा तर- या चाणक्याबरोबर जायचे की नाही, हाच होता ना! गेलो तरी अडचण अन् नाही गेलो तरीही अडचण. अशा वेळी कुणीही देवाचा धावा करेलच ना! तसा तो त्यानं केला. तब्येतीचं म्हणाल, तर ती आधीही फारशी बरी नव्हतीच. साठी उलटलेल्या माणसाला थोडय़ाफार आरोग्य-कुरबुरी या राहणारच. मग त्याचा आधार घेत आता ‘राजकारण नाही’ असं जाहीर केलं, तर रजनीचं चुकलं कुठे? तसंही आपल्याकडे आरोग्याचं कारण पुढे केलं की प्रश्न विचारायचे नसतात. सभ्य भारतीयांनी रुजवलेली पद्धत आहे ती. या सभ्यतेच्या आडून एखादा स्टार स्वत:ची सुटका करून घेत असेल तर कुणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. हो, त्या दिल्लीवाल्यांना मात्र आता हात चोळत बसावे लागणार, नवा भिडू शोधावा लागणार. तिथलाच दुसरा स्टार आडनावामुळे त्यांना चालत नाही. नटनटय़ांवर विसंबून राहिले की अशीच पंचाईत होणार. कसलेले राजकारणी बघा, दोन-तीनदा अवघड शस्त्रक्रिया करूनसुद्धा राजकारणात टिकून राहतात. त्यासाठी धावाधाव करत असतात. त्या मानानं हा फारच ‘कच्चा लिंबू’ निघाला, असा तर्क मात्र काढू नका. स्टार आहे तो! आणि ते- मराठी माणसं तशी कचखाऊच असतात, असं कारण बिलकूल पुढे करायचं नाही. अडकलेली मात कशी सोडवायची हे मराठी माणसालाच बरोब्बर कळतं. समजलं ना! असे तर्कवितर्क काढण्यापेक्षा द्रविडींच्या दोन्ही गोटांत झालेला आनंद बघा. दोन्ही हातांनी छाती बडवून टाकलेले सुटकेचे नि:श्वास ऐका. मग या माघारीची व्यापकता लक्षात येईल अन् तमिळी अस्मिता काय असते तेही कळेल. आता उरतात प्रश्न दोन. रजनी मक्कल मंद्रमचं काय होणार? अहो, ती संघटना सुरूच राहील. राजकारणात न जाताही राजकारण करता येतंच ना! बाकी काहीही असो, रजनी तेवढा हुशार आहेच की! आणि दुसरा, देव नाकारणाऱ्या माणसांना रजनीचं कारण पटेल काय? अहो, त्यांनी दगडाचा देव नाकारला, माणसातला थोडीच! हुशार आहेत ते लोक. बरोबर मार्ग काढतात. म्हणून तर रजनी ‘सुपरस्टार’ आहे!
Comments
Post a Comment