‘३ इडियट्स’मधील भूमिकेसाठी बोमन इराणींना शिकावी लागली ‘ही’ अजब कला

 

३ इडियट्स या चित्रपटातील व्हायरसची भूमिका ही त्यांच्या नावाजलेल्या भूमिकांपैकी एक आहे.

बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बोमन इराणी यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. पण ३ इडियट्स या चित्रपटातील व्हायरसची भूमिका ही त्यांच्या नावाजलेल्या भूमिकांपैकी एक आहे. एवढी अप्रतिम भूमिका साकारणे आव्हानात्मक असल्याचे एका मुलाखतीत खुद्द त्यांनीच सांगितले आहे.

३ इडियट्समध्ये बोमन इराणी यांनी डॉक्टर विरू सहस्त्रबुद्धेची भूमिका साकारली होती. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना व्हायरस हे नाव ठेवलं होतं. “मला या चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल फारशी माहिती नव्हती कारण मी माझ्या भूमिकेवर काम करण्यात व्यस्त होतो. ही भूमिका माझ्यासाठी खूप कठीण होती. कारण व्हायरस नेहमीच रागात असायचा. खऱ्या आयुष्यात मी असा राहू शकत नाही. व्हायरस ही भूमिका अशी होती की त्या व्यक्तीला खऱ्या आयुष्यातही मला भेटण्याची इच्छा नव्हती. या भूमिकेसाठी मी दोन्ही हातांनी लिहिण्याचे धडे घेतले होते. त्यासाठी मी एवढी मेहनत घेतली होती की आता जरी मी कधी प्रयत्न केला तर दोन्ही हातांनी सहज लिहू शकतो.” असं बोमन इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितले.

३ इडियट्स हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला. जगभरातील लोकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता. चित्रपटाने एकूण ३९५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात बोमन इराणींसोबतच आमिर खान, करीना कपूर खान, आर माधवन, शर्मन जोशी, मोना सिंग आणि परिक्षित सहानी हे मुख्य भूमिकेत होते.

Comments