नाटे येथुन बेकायदा गुरांची वाहतुक करणाऱ्या तिघांच्या सापळा रचत आवळल्या मुसक्या
राजापूर:नाटे येथुन बेकायदा गुरे वाहतुक करणाऱ्या तिघांना जागरूक ग्रामस्थांनी सापळा रचून पकडून देत गुरे तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. याप्रकरणी नाटे पोलिसांनी तिघांना जेरबंद केले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गेले अनेक दिवस नाटे, आडिवरे, जैतापूर, देवाचे गोठणे, धाउलवल्ली ह्या भागात गुरांची तस्करी करणारे इसम फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यांना रंगेहात पकडून देण्याचा चंग काही जागरूक ग्रामस्थांनी बांधला होता. शुक्रवारी हे इसम नाटे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना पकडून देण्यासाठी ग्रामस्थांनी सापळा रचला. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गयाळ कोकरी भागामध्ये संतोष कुवेस्कर ह्यांच्या गोठ्यात संशयास्पद घटना घडत होत्या. दरम्यान बाहेरून एक बोलेरो काळ्या रंगाचा प्लास्टिक कागदाने संपूर्ण झाकलेली आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली गाडी सतत त्या स्पॉट वरून स्पीड सावकाश करून पुढे वेगाने जाताना दिसत होती. त्याचबरोबर पाहऱ्यावर असलेले ग्रामस्थ सतर्क झाले. त्यातील एक टीम ने तडक नाटे पोलीस स्टेशन ला धाव घेत चालू प्रकारची माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता सर्व तयारीनिशी पोलिसांची गाडी घटनास्थळी निघाली. पोलिसांनी गाडीचा चालक राजेश पाटणकर आणि बाजूला बसलेला गुलाब इम्तियाज निशानदार आणि संतोष कुवेसकर यांना ताब्यात घेतले. तर टेम्पोत बांधलेली चार गुरे उतरवून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना पुन्हा संतोष कुवेसकर यांच्या गोठयात बांधण्यात आली. या मोहीमेत सहभागी होत मोहीम यशस्वी केलेल्या ग्रामपंचायत सदस्य संजय बांदकर, मिलिंद शहाणे, सुनिल पाध्ये, कपिल रानडे, अनिल पिलके, महेश सातुर्डेकर व यांचे पोलिस व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment