कोकण रेल्वे मार्गावर उधना मडगाव एक्स्प्रेस ३० डिसेंबरपासून धावणार
चिपळूण:नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कोकण मार्गावर अनेक साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी ३० डिसेंबरपासून उधना (सुरत)- मडगाव सुपरफास्ट फेस्टिवल साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने पूर्णपणे आरक्षित असणारी २२ डब्यांची फेस्टिवल स्पेशल कोकण मार्गावर धावणार आहे. ३० डिसेंबर रोजी बुधवारी व १ जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी ४ वा. उधना येथून सुटून दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ९.३० वा. मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ३१ डिसेंबर रोजी गुरूवारी व २ जानेवारी रोजी मडगाव येथून सकाळी १२ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वा. उधना येथे पोहोचेल. वसईमार्गे धावणाऱ्या या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड. आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या अन्य ५ गाड्यांना जानेवारी ते फेब्रुवारी अखेर पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment