‘जेव्हा तुम्ही केवळ २१ वर्षांच्या असता, अन्…’; दीपिकाने सांगितला ‘तो’ अनुभव
'ओम शांती ओम'च्यावेळी दीपिकासोबत घडला 'तो' प्रकार
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट विसरणं अनेकांना शक्य नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिकाने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट २००७ मध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं. या चित्रपटानंतर दीपिका प्रकाशझोतात आली. मात्र, कलाविश्वातील तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत तिने तिचा संघर्षप्रवास सांगितला आहे. विशेष म्हणजे ‘ओम शांती ओम’वेळी तिला अनेकांनी तिच्या काम करण्याच्या पद्धतीवरुन ट्रोल केलं होतं.
“ओम शांती ओमच्या वेळी काही जणांच्या ग्रुपने माझ्यावर प्रचंड टीका केली होती. माझ्या काम करण्याच्या शैलीवरुन मला ट्रोल केलं होतं. ‘अरे ही तर मॉडेल आहे, हिला काय अभिनय येणार’, असं म्हणत माझी अनेकदा खिल्ली उडवली. अनेकांनी माझ्या विरोधात लिहिलं, काही चुकीची माहिती पसरवली. खरं तर या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम झाला. जेव्हा तुम्ही केवळ २१ वर्षांच्या असता आणि या वयात तुम्हाला अशा टीकांना सामोरं जावं लागतं त्यावेळी सगळ्याचा परिणाम थेट तुमच्यावर होत असतो”, असं दीपिका म्हणाली पुढे ती म्हणते, “पण या टीकाकारांमुळेच मी पुढे जाऊ शकले. त्यांच्या टीकांमुळे मी माझ्या कामात सुधारणा केली. ज्यामुळेच मी आज या जागेवर आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांचे मनापासून आभार. त्यावेळी मला काही गोष्टी समजत नव्हत्या. पण, शाहरुख आणि फराह खानने माझी साथ दिली आणि या सगळ्या गोष्टी मला नीट समजावून सांगितल्या. दरम्यान, ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट अनेकांमध्ये लोकप्रिय असून त्यातील गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोण हिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर शाहरुख- दीपिका ही जोडी ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्येदेखील एकत्र झळकली होती.

Comments
Post a Comment