रत्नागिरी न.प सभापतीपद बिनविरोध

 रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेनेचे पूर्ण बहुमत असल्याने अपेक्षेप्रमाणे विषय समिती सदस्य तसेच सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. शिवसेनेचे नगरसेवक निमेश नायर आरोग्य समितीचे नूतन सभापती बनले आहेत. सेनेच्याच दिशा साळवी यांची पाणीपुरवठा समिती सभातिपदी, राकेश ऊर्फ बाबा नागवेकर बांधकाम समिती सभापती, विकास पाटील नियोजन समिती सभापती, तर महिला बालकल्याण सभापतिपदी कौसल्या शेट्ये यांची निवड झाली आहे. 'रनप'च्या विषय समिती सदस्य आणि सभापतींच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत विकास सूर्यवंशी यांनी काम पाहिले.राष्ट्रवादीच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी दीड वर्षापूर्वी शिवसेनेला समर्थन दिले. त्यामुळे यावेळी महिला बालकल्याण समिती सभापतिपदासह स्थायी समिती सदस्यपद राष्ट्रवादीच्या सदस्यांना मिळाले आहे. शिवसेनेला समर्थन देणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुसा काझी यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका स्मितल पावसकर यांचीही स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. सर्व सभापती स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.स्थायी समितीवर भाजपचा एक सदस्य निवडला जातो. हे सदस्यत्व मिळावे यासाठी भाजपच्या तीन नगरसेवकांमध्ये चुरस होती. यातून पक्षीय अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गटनेते समीर तिवरेकर यांचीच निश्चिती केली. त्यानुसार त्यांची भाजपचे स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली. राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर हे एकटेच नगरसेवक राहिल्याने त्यांच्याकडून समिती सदस्य पदासाठी कोणाचीही लेखी मागणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा एकही सदस्य कोणत्याही विषय समितीत नाही.शिवसेनेचे 30 पैकी 19 नगरसेवक असून, राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचेही समर्थन आहे. पाच विषय समिती सदस्यपदी शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन सदस्य निवडले गेले आहेत. शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष काम पाहतात.बांधकाम समितीचे सभापतीपद शिवसेनेला समर्थन देणार्‍या राष्ट्रवादीचे सुहेल साखरकर यांना सभापतीपद देण्याचे निश्चित झाले होते. परंतु, त्यांनी त्यांच्या व्यावसायिक कारणास्तव ते सभापतीपद नाकारल्याने या समितीचे सभापतीपद कौसल्या शेट्ये यांच्याकडे राहिले आहे.

Comments