1985 चा तो का काळ होता . त्यापूर्वी इचलकरंजी मध्ये नाट्यगृह नव्हतं .
1985 चा तो का काळ होता . त्यापूर्वी इचलकरंजी मध्ये नाट्यगृह नव्हतं . गोविंदराव हायस्कूलच्या रंगमंचावर पुण्या-मुंबईचे त्यावेळी ऑर्केस्ट्रा व्हायचे .मेलडी मेकर्स , सेवन कलर्स ,कलाकार ,महेश कुमार आणि पार्टी ,सूनहरी यादे , सरगम राज कपुरकी , मुव्हि म्युझिकल नाईट. ..असे अनेक ऑर्केस्ट्रा त्यावेळी इचलकरंजी मध्ये यायचे, इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूल मधिल भव्य रंगमंचावर तिकीट लावुन त्यावेळी शो व्हायचे . आम्ही ते ऑर्केस्ट्रा बघायला जायचं. मला वाटतं जमीन दहा रुपये तीकीट असायचं.पैशाची वाणवा असल्यामुळे आम्ही जमीनीवरील तिकीट काढायचो .
ऑर्केस्ट्रा बघता बघता वाटायला लागायचं की आपणही यांच्यासारखे का नाही होऊ शकत . का नाही यांच्या सारखे गावु शकत .त्यावेळी एक ऑर्केस्ट्रा बघत असताना मी सहज मित्रांना म्हणालो ,एक ना एक दिवस या गोविंदराव हायस्कूलच्या रंगमंचावर मी ही ऑर्केस्ट्रा मध्ये गाणे म्हणणार . त्यावेळी सगळे मित्र हसले होते . त्यातला एक बजरंग आबी नावाचा मित्र म्हणाला ,स्टेजवर तुला लाईट बांधण्यासाठी बोलवतात काय बघ , मग गाण्याच बघू , मला त्यावेळी राग आला होता त्याचा . पण मी काही करू शकत नव्हतो .पण त्या दिवसापासून मात्र जिद्द बाळगली कोणत्याही परिस्थितीत आपण एक का होईना पण ऑर्केस्ट्रा मध्ये गाणं म्हणायचं.आणि मग मी जिद्दीने कामाला लागलो . त्यावेळी मी मुकेशजींची गाणी म्हणायचो. मला त्यांचा आवाज खूप आवडायचा . त्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करु लागलो. त्यांच्या आवाजातला दर्द , धिर गंभीरता , बोलक्या भावना , आवाजाची ढब ,गाताना आवाजातील बेस ,बारीक खरं , गाण्यातल्या हरकती , अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आणी गाणी म्हणु लागलो . माझा आवाज लोकांना आवडायला लागला . रियाज करतांना कांहीं मुकेश प्रेमी येवुन बसायचे . त्यांना माझी गाणी खुप आवडायची . मुकेश म्हणून माझ्याकडे लोक कौतुकाने बघू लागले .बोलु लागले. ऑर्केस्ट्रात गाणं म्हणायची आता खुप इच्छा होऊ लागली. पण त्यावेळी आपल्या भागामध्ये जास्त ऑर्केस्ट्रा नव्हते .जे होते त्यांचे कलाकार ठरलेले होते . त्यामुळे मी त्यांच्यात जाऊ शकत नव्हतो . पुण्या बॉम्बेला जाणं परवडणारं नव्हतं . रात्र रात्रभर विचार करत बसायचो . आणि शेवटी विचार केला की आपण स्वतः जर ऑर्केस्ट्रा काढला तर ! ....
शेवटी मी विचार करुन निर्णय घेतला. इचलकरंजीत त्या वेळीअनेक नवोदित कलाकार उदयास येत होते.मी ऑर्केस्ट्रा काढणार आहे हे कळल्यावर अनेक कलाकार येऊन भेटु लागले .कांहींचा शोध घेऊ लागलो . शोध घेत घेता कांहीं कलाकार पसंतीस पडले.गायक सुरेश कदम, संजय शेटके ,रजनीकांत राठोड, श्रीकांत पोतदार ,नारायण लंगोटे ,अशा अनेक कलाकारांना घेऊन त्यावेळी " सुपर मेलडी "या नावाचा ऑर्केस्ट्रा काढायचे ठरवले आणि मग रियाज जोरात चालू झाला . रफी ,मुकेश, किशोर, या मुख्य गायकांना गायकांचा आवाज त्यांच्या आवाजाची ढब या सगळ्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू लागलो .आणि या कलाकारांना शिकवू लागतो .त्यांचा रियाज घेऊ लागलो.गाण्यांचा खूप अभ्यास झाला. प्रत्येक कलाकार मनापासून अभ्यास करू लागला . गाणे आत्मसात करू लागले. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे कलाकार गावु लागले .माझा आत्मविश्वास वाढला.गाण्याचा विषय ब-यापैकी संपला होता. पण म्युझिक ....
त्यावेळी इचलकरंजी तले " अरूण देसाई " यांचा म्युझिक ग्रुप होता . बाहेरच्या ऑर्केस्ट्रासाठी म्युझिक देण्यासाठी ते जायचे . त्यांना बोलावून घेतलं. इचलकरंजीतल्या कलाकारांनी एक नवीन ऑर्केस्ट्रा चालू केला आहे . याचा त्यांनाही खूप आनंद झाला .नंतर पद्माकर कुरकुटे , अनिल लोकरे, हे कलाकार मिळाले. अरुण देसाई आणि त्यांच्या टिमने संगीताची बाजू सांभाळली.त्यांनी आमच्या ऑर्केस्ट्रा ला संगीत साथ देण्याचं वचन दिलं .त्याप्रमाणे रोज ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस चालु झाली . अनेक नवनवीन गाण्याची भर पडत गेली .एक दोन नव्हे तर जवळजवळ शंभर - शंभर गाण्यांचा अभ्यास झाला .त्यातून काही सिलेक्टेड गाणी घेऊन ती ऑर्केस्ट्रात घ्यायचे ठरवले आणि इचलकरंजी शहरामध्ये पहिला व्यवसायिक ऑर्केस्ट्रा जन्माला आला ..
31 डिसेंबर 1985 रोजी गोविंदराव हायस्कूलच्या भव्य रंगमंचावर माझा ऑर्केस्ट्रा " सुपर मेलडी " हा करण्याचे योजिले त्याप्रमाणे सर्वांनी जय्यत तयारी केली. सांगलीच्या हसीना कवठेकर ,संगीता कुलकर्णी, त्यावेळी गायिका म्हणून आमच्या सोबतीला होत्या . इचलकरंजी मध्ये पहिल्यांदाच ऑर्केस्ट्रा निघत होता . याचा आम्हा बरोबर इचलकरंजीकरांनाही अभिमान वाटत होता . आणि तो दिवस ठरला . 31 डिसेंबर 1985 त्या ऑर्केस्ट्रासाठी खास करून निवेदक म्हणून कराडचे सुप्रसिद्ध निवेदक मिमिक्री आर्टिस्ट कलाकार एस .लियाकत हे होते .त्यावेळी आमच्या ऑर्केस्ट्रा साठी त्यांना बोलावलं होतं . मिरजेहून सव्वाशे ची साऊंड सिस्टिम आणली होती ., ऑर्केस्ट्रा लाईट इफेक्ट अशा सर्व लवाजम्यासह 31 डिसेंबर 1985 रोजी " सुपर मेलडी " या ऑर्केस्ट्राचा पहिला कार्यक्रम गोविंद हायस्कूलच्या त्या भव्य रंगमंचावर चालू झाला होता . ओ दूर के मुसाफिर या मोहंमद रफिंच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. टाळ्यांचा कडकडाट झाला.. प्रत्येक गाण्याला वन्स मोअर मिळत होता., टाळ्यांचा कडकडाट होत होता , सगळेच आम्ही भारावून गेलो होतो .आणि आमच्या बरोबर प्रेक्षक ही . . केलेल्या कष्टाचे आज सार्थक झाले होते.तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर आयुष्यात अनेक कार्यक्रम केले. मराठी चित्रपटाचा संगीतकार म्हणून ही नावारूपाला आलो . महाराष्ट्रातील दिग्गज गायक रविंद्र साठे, वैशाली सामंत,बेला शेंडे , स्वप्निल बांदोडकर ,विजय सरतापे अशा अनेक गायकांनी माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली काम केले. कलेच्या विविध कलाक्षेत्रात नांव मिळवलं . अनेक पुरस्कार मिळाले. पण इचलकरंजीच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा तो क्षण माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. ज्यांच्या मुळे मी हा ऑर्केस्ट्रा करु शकलो .ज्यांनी बाकीची सगळी बाजु सांभाळली . ते माझे मित्र कलंदर अपराज . यांना तर मी कधीच विसरू शकत नाही.
३१डिसेंबर १९८५ ...आज जवळ जवळ ३५ वर्षे झाली,. पण तो दिवस ,ते क्षण , प्रॅक्टीस चे ते दिवस , कांहीं कांही विसरु शकत नाही. आज ही ते दिवस नजरेसमोर दीसु लागतात . नंतरच्या काळामध्ये खुप पुरस्कार मिळाले. खुप कौतुक झालं .मान मिळाला ,धन ,मिळालं ,पण त्या वेळचा तो आनंद खुप वेगळा . कायम आठवणीत राहणारा .शेवटच्या श्वासापर्यंत कधीच न पुसणारा....आज ३१तारखेला.. त्याला३५वर्षेपुर्ण होतात .त्यानंतर माझ्या गृप मधल्या कलाकारांनी कला विश्वात भरपुर नांव कमावलं . पण भेटले की आज ही म्हणतात .ते मंतरले दिवस आम्ही आज ही विसरु शकत नाही. आज किशोर कुमारजींचं गाणं आठवतं. " कोई लौटादे मेरे बिते हुवे दिन ! बिते हुवे दिन वो हाये प्यारे पल छीन !" ते भारावलेले दिवस आपल्या आयुष्यात परत कधी येतील कां !आज ही तो प्रत्येक दिवस म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षण आठवतो.आणि मन भरुन येत ..
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
चंद्रकांत जगताप
३/१०५९ सांगली वेस रिंग रोड,इचलकरंजी,
९८५०८९४५५३
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
---------------------------------------------------
इचलकरंजीतील कला क्षेत्राला जगताप सरांच्या या लेखामुळे उजाळा मिळाला.
ReplyDelete