⭕‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह संस्थेकडून विवाह इच्छूक 17 तरुणांची फसवणूक
नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह संस्थेकडून विवाह इच्छूक 17 तरुणांची फसवणूक
आज काल मुलांच्या प्रमाणात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे. यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. यामुळे लग्नाचे वय होऊन देखील लग्न जुळत नसल्याने अनेक तरुण नाईलाजाने विवाह संस्था अथवा वधू वर सूचक मंडळाकडे धाव घेतात आणि त्यांच्या आमिषाला बळी पडतात. सुंदर मुलींचे फोटो दाखवून 17 तरुणांना सुमारे 7 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नवरीही गेली अन् पैसेही गेले, अशी अवस्था या तरुणांची झाली आहे. याप्रकरणी तुंगत येथील तरुणाने पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
मुंबईतील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील तरुणांची फसवणूक केल्याची धक्कायदायक माहिती समोर आली आहे. या विवाह संस्थेतील राजन पाटील आणि सचिन बनसोडे यांची पंढरपुरातील शहाजी शिंदे यांच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर राजन पाटील यांनी शहाजी शिंदे यांना एक ऑफर दिली. पैशाचे आणि नोकरीचे आमिष दाखवून विवाह इच्छुकांकडून पैसे घेऊन त्यांची विवाह नोंदणी करण्यास पाटील यांनी शिंदे यांना सांगितले. त्यानुसार शहाजी शिंदे यांनी त्यांच्या पंढरपुरातील सुस्ते गावातील विवाह इच्छुक शाम शिंदे याला या संस्थेची माहिती देऊन विवाह नोंदणी करायला सांगितली. तसेच लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचे फोटोही शाम यांना दाखवले आणि या मुलींचे मोबाईल नंबर देऊन त्यांच्याशी बोलणंही करून दिलं. मुलींचा फोन मिळाल्याने शाम यांनीही मुलींशी बोलणं सुरू केलं. या दरम्यान, शाम यांनी त्याच्या विवाह इच्छुक चार मित्रांनाही या मुलींचे नंबर देऊन त्यांच्याशी बोलणं करून दिलं. या मुलींनी शाम यांना फोन करून लग्नासाठी लागणारे साहित्य, कपडे, सोने आदींसाठी पैशाची मागणी केली. त्यामुळे शाम याने त्याच्या चार मित्रांचे मिळून असे दोन लाख रुपये या मुलींच्या नावावर फोन पेवरून ट्रान्स्फर केले होते. मात्र पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर त्या मुली बोलायच्या बंद झाल्या त्यावरून शाम याला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
17 तरुणांची फसवणूक
या संस्थेने सोलापूरसह राज्यातील सुमारे 17 तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थेने आतापर्यंत 6 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे विवाह इच्छुक तरुणांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. सोशल मीडियातून किंवा फोन कॉलवरून कुणीही पैसे मागितल्यास देवू नये, असे आवाहन पंढरपूरचे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment