माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

 


माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे गेल्या १० वर्षांतील संपत्तीच्या विवरणाची मागणी करण्यात आली आहे. चव्हाण यांना २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे.

पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी आज माध्यमांना दिली. या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आलं आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहे. या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यात येईल, असं चव्हाण पुढे म्हणाले.

आयकर विभागाच्या नोटिशीवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना आलेल्या नोटिशीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करत यंत्रणांच्या गैरवापरावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. 'सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, याबद्दल भाजपनं नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे,' असं चव्हाण यांनी म्हटलं.

केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला सातत्याने लक्ष्य करत असल्यानं आयकर विभागाची नोटीस बजावण्यात आली असं वाटतं का, असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर तसं काही असेल असं मला वाटत नाही, मात्र सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलं माहीत आहे, असं उत्तर चव्हाण यांनी दिलं. भाजपच्या नेत्यांना आयकर विभाग नोटिसा पाठवत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Comments