प्रेसनोट -गडचिरोली जिल्हा हा राज्यातील दुर्गम जिल्हा असून इतर जिल्ह्यांप्रमाणे सोयीसुविधा नसलेला जिल्हा आहे.

 गडचिरोली जिल्हा हा राज्यातील दुर्गम जिल्हा असून इतर जिल्ह्यांप्रमाणे सोयीसुविधा नसलेला जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील असून तेथे असणा-या सततच्या नक्षलवादी हालचालींमुळे याठिकाणी शासकीय योजना राबविण्यात अनेक अडचणी येतात. यामुळे गुन्ह्यांचा प्रतिबंध व तपास करणे , कायदा व सुव्यवस्था राखणे  , इतर शासकीय खात्यांशी समन्वय ठेवणे याचबरोबर पोलीस खात्याशी संबंधित असलेल्या या कर्तव्या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेल्या समाजास विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी  , या योजनांचा जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळावा तसेच आदिवासी / स्थानिक ग्रामस्थ व शासनामध्ये जवळीक निर्माण व्हावी यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.


 याच भावनेतून गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील मौजा इरापणार , ता.भामरागड हे अतिसंवेदनशील गाव डाॅ. श्री. मोहित कुमार गर्ग  , पोलीस अधीक्षक  , रत्नागिरी यांनी दत्तक घेतले आहे. डाॅ.मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरीला बदलून येण्याआधी गडचिरोली जिल्ह्यात अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले असल्याने तेथील समस्यांची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे  तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणींचा विचार करून गावातील आदिवासी  , गरीब जनतेला देश - जागतिक पातळीवरील घडामोडी तसेच शेती व्यवसाय आणि विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे टि.व्ही. तसेच इतर घरगुती वापराच्या वस्तू दिवाळी सणादरम्यान भेट म्हणून पाठविल्या होत्या. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मौजा गर्देवाडा येथील भगवंतराव आत्रम शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य व कपडे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पाठविण्यात आले होते. 


रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. श्री. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पाठविलेल्या या साहित्याचे वाटप दि.25/11/2020 रोजी मौजा इरापणार या दत्तक गावातील ग्रामस्थांना तसेच दि.26/11/2020 रोजी मौजा गर्देवाडा येथील भगवंतराव आत्रम शाळा येथील शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलीसांच्या हस्ते करण्यात आले. सदरची  मदत  ही  जाणीव फौंडेशन , रत्नागिरी , पोलीस मित्र (माजी एन.सी.सी.कॅडेटस) रत्नागिरी व जय हो प्रतिष्ठान, रत्नागिरी  तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या उस्फूर्त सहभागातून दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.

Comments