संगमेश्वर भाजपतर्फे राष्ट्रीय गृहिणी दिवस साजरा

 


संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बुद्रुक येथे भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुक्यातील महिला मोर्चाच्या नवनियुक्त उपाध्यक्षा राजश्री कदम यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय गृहिणी दिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कोमल रहाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले. 

'श्री सखी राज्ञी जयती' अशी राजमुद्रा असणार्‍या स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी अखंड सौभाग्यवती महाराणी येसूबाईसाहेब यांच्या आपण लेकी आहोत. माँसाहेब जिजाऊ आपल्या आदर्श आहेत. या दोघीही उत्तम गृहिणी होत्या आणि गृहिणी असूनही त्या राजधुरंधर होत्या. 

एकीने शिवबा घडवून त्याला छत्रपती शिवाजी महाराज केले तर दुसरीने एक धगधगते अग्निकुंड स्वतःच्या पदरात बांधुन घेतले. आज आपण त्यांच्यात दैवी गुण पहातो. मात्र त्यांचा एक अंश जरी आपण घेतला तरी आपण नवभारताची नवीन पिढी घडवू शकतो असा आशावाद कोमल रहाटे यांनी व्यक्त केला.

यानंतर बोलताना राजश्री कदम म्हणाल्या कि, इतिहासाप्रमाणे सार्‍या भारतीयांचा वर्तमान उज्ज्वल करणारे पंतप्रधान आणि आपले शीर्षस्थ नेते नरेंद्रभाई मोदीजी यांच्या मातोश्री श्रीम. हिराबेन मोदी यांना आपण आदर्श मानू शकतो. तसेच 1995 साली जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमाता श्रीम. अनुराधाताई गोरे यांचे कर्तृत्वही थोर आहे. अशी पिढी घडण्यासाठी थोरांची चरित्रे वाचली पाहिजेत. 

मुलांवर संस्कार केले पाहिजेत. आणि हे काम करण्याची क्षमता फक्त गृहिणींमध्येच आहे. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात कुंकवाच्या डब्या वाण म्हणुन वाटण्यात आल्या. कुंकू हे सौभाग्याचे लेणं असल्याने त्याचे वाटप करून सर्व महिलांनी राष्ट्रीय गृहिणी दिनाच्या एकमेकींना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक सर्व काळजी आणि सामाजिक अंतराचे पालन केले.

Comments