“हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे?”
हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा प्रश्न विचारत भाजपा नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बीड अॅसिड हल्ल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
हाथरसवरुन राजकारण करणारे लोक आता कुठे गेले असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यात सातत्याने महिलांवर अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावलं उचलताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत अशीही टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
काय आहे प्रकरण –
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Post a Comment