पिरंदवणे गावच्या सरपंच सौ. माधवी गुरव यांचा सेवापूर्ती सोहळा


संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गुरववाडी येथील रहिवासी, गावच्या सुनबाई सौ. माधवी पांडुरंग गुरव या आज सरपंच म्हणुन आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. यानिमित्ताने गुरववाडी मंडळाने एक छोटेखानी समारंभ आयोजित करून त्यांचा सन्मान केला. 

सौ. माधवी गुरव या अतिशय मितभाषी, मृदु आणि संयमी सरपंच या नात्याने गेली 5 वर्षे ग्रामपंचायतीवर आपली छाप पाडली. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या तक्रारी येऊ नयेत असा त्यांचा आग्रह होता. 

मात्र त्यातही तक्रारी आल्याच तर त्यांचे निवारण करून त्यांनी नागरिकांना न्याय दिला. त्यांच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग त्रस्त झाले असताना गावाचे आरोग्य कायम राखण्यात त्यांनी यश मिळवले. अतिशय कार्यतत्पर असणार्‍या माधवीताई निवईवाडी रस्त्याच्या कामावर स्वतः हजर होत्या. 

तसेच निवईवाडी येथे बंधारा कामावर वाद होऊ नयेत या हेतूने तिथे उपस्थित राहून तक्रारींचे निवारण केले. असे त्यांचे अनेक पैलू आहेत. त्या गुरववाडीच्या पहिल्या महिला सरपंच असल्याने आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन वाडीचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र सीताराम गुरव यांनी या प्रसंगी केले.

यावर भावुक झालेल्या सरपंच महोदया म्हणाल्या, की एखादी स्त्री तेव्हाच पुढे जाते जेव्हा तिच्या घरचे तिला प्रोत्साहित करतात. गुरववाडी माझे घर आहे. मी या गावात सुन म्हणुन आले असले तरी सबंध गावाने लेक म्हणुन प्रेम दिले आणि सरपंच म्हणुन आदरही दिला. 

सरपंच पदावर नवीन असताना गावाने मला सांभाळून घेतले, वाडी तर सदैव माझ्या बरोबर होती. त्यामुळे ही 5 वर्षे कशी निघून गेली ते कळले सुद्धा नाही. या 5 वर्षांत अनेक बरे वाईट प्रसंग आले पण या सर्व प्रसंगात मला साथ देणारे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, माझ्यावर माया करणार्‍या आमच्या मार्गदर्शिका जि. प. सदस्या सौ. रचनाताई महाडिक वहिनी, मा. नामदार महोदय श्री. उदयजी सामंत यांनी वेळोवेळी मदत करून मला सांभाळून घेतले. मला कायम या सर्वांच्या ऋणात रहायला आवडेल.

कार्यक्रमाला कोरोनाचे भान राखून ग्रामस्थ उपस्थित होते. गुरववाडी मंडळाने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच बाईंचा गौरव केला. वाडीतील अनेक सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्यांनी सौ. माधवीताईंना भावी निरामय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments