संगमेश्वर भाजपच्या दणक्याने शास्त्रीपूल-डिंगणी-पिरंदवणे रस्ता दुरुस्तीस सुरुवात


संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल-डिंगणी-पिरंदवणे रस्त्याची चाळण होऊन 'रस्त्यात खड्डा ऐवजी खड्ड्यात रस्ता' अशी दुरावस्था झाल्याने सामान्य नागरिकांचे होणारे अतोनात हाल पाहून आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी वारंवार भाजप तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्याशी संपर्क केल्याने भाजप संगमेश्वरकडून दि. ३१ ऑक्टोबर, २०२० रोजी उपअभियंता यांना निवेदन देण्याचे वृत्तपत्रात जाहीर करण्यात आले. 

त्यानुसार दि. ०३ नोव्हेंबर रोजी श्री. भारती साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचा विचार करून रस्त्याचे काम वेळीच सुरू करावे अन्यथा जनआंदोलन उभारू असा गर्भित इशारा मिळताच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि परिणामस्वरूप रस्त्याचे काम सुरू झाले.

हा एक अभूतपूर्व प्रयत्न होता. खाडी भागात आवश्यक त्या प्रमाणात कोणी लक्ष देत नाही. हे वारंवार पहायला मिळते आणि याचेच द्योतक शास्त्रीपूल-डिंगणी-पिरंदवणे हा रस्ता आहे. गेली कित्येक वर्षे हा रस्ता या ना त्या कारणाने नादुरूस्त स्वरुपात पहावयास मिळत आहे. मात्र याविषयी सत्ताधारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारल्यास कोणत्या तरी मोठ्या योजनेच्या भूलथापा मारून लोकांची बोळवण केली जाते. 

त्यामुळे आता भाजप या भागातील जनतेसाठी जनतेबरोबर राहून काम करणार आहे. या यशाचे श्रेयही जनतेचे आहे अशी आमची विनम्र धारणा आहे. कारण एकवेळ भाजपच्या आंदोलनाकडे प्रशासन कानाडोळा करू शकेल पण जनतेच्या न्याय्य हक्कासाठी जनतेने उभारलेल्या जन आंदोलनाकडे नाही.

श्री. अधटराव पुढे म्हणाले, आमच्या निवेदनाचा विचार करत उपअभियंते श्री. भारती साहेब यांनी तातडीने यंत्रणा कामास लावली व आज रोजी रस्त्याचे काम सुरू झाले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. शिवाय या प्रकरणात संगमेश्वर-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी काही प्रमाणात लक्ष घातल्याचे समजते. त्यांचेही जनतेच्या वतीने आभार.

या संपूर्ण प्रकरणास नियोजनबद्ध रीतीने चालवणारे भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. राकेश जाधव व तालुका उपाध्यक्ष श्री. मिथुन निकम यांनी या कामाचे श्रेय जनतेला देतानाच आम्ही कामावर लक्ष ठेऊन रहाणार आहोत असे प्रतिपादन केले. स्वतः जाऊन कामगारांची विचारपूस केली. कोरोना दरम्यान झालेल्या त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. व आपल्या परीने शक्य ती मदत करत रहाण्याचे ठोस आश्वासन दिले.

Comments