जादा दराने जमीन खरेदीसाठी भाजपचा विरोध
सह्यांची मोहीम; सर्व प्रभागांमध्ये नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
रत्नागिरी-
शहरातील आलीमवाडी येथे अवास्तव किंमतीला जागा खरेदी करण्याचा रत्नागिरी नगरपरिषदेचा कुटील हेतू हाणून पाडण्यासाठी परिषद सभागृहासह जनतेमध्येही हा विषय भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक मांडणार आहेत. एवढ्या रक्कमेला जागा खरेदी करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करू नये, अशी मागणी नगरवासीय करत असून त्यांच्या सह्यांची निवेदने उद्यापासून (ता. 23) रत्नागिरी नगरपरिषदेत सादर करण्यात येणार आहेत. भाजपने या आंदोलनाला व्यापक स्वरूप दिले असून प्रत्येक प्रभागातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आलीमवाडी येथे पाणी टाकी उभारण्यासाठी सुमारे चार गुंठे जागा नगरपरिषद खरेदी करत आहे. सदर जागेची किंमत शासनाच्या त्रिसदस्यीय समितीने ठरवली असून ती किंमत एक कोटी 27 लाख, 35 हजार 551 रुपये आहे. मात्र आलीमवाडी परिसरातील जमिनीची एवढी भली मोठी रक्कम अवास्तव जास्त आहे. अतिरिक्त दर देऊन ही जागा खरेदी केली जात आहे. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. इतक्या दराने जागा खरेदीचा निर्णय करताना केवळ त्रिसदस्यीय समितीने किंमत ठरवली एवढ्या आधारावर करणे अयोग्य ठरेल. नगरपरिषद गेली 4 वर्ष पाणी योजना पूर्ण करू शकली नाही. त्याच योजनेसाठी आता अरिरिक्त खर्च जमीन खरेदीसाठी करण्याचा घातलेला घाट म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय वाटतो. नगरपरिषद ही लोकप्रतिनिधींनी चालवणे व ती सारासार विचार करून नगरपरिषदेचे पर्यार्याने जनतेचे हित रक्षण्यासाटी निर्णय घेऊन चालवणे अपेक्षित आहे. मात्र अतिरिक्त दर देऊन जागा खरेदीसंदर्भात सभेत आलेला विषय पाहता सखेद धक्का बसला.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये याकरिता भाजपने सह्यांची मोहीम राबवली आहे. भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक प्रभागांत फिरून हा विषय जनतेला समजावून देत चुकीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे, याकरिता स्वाक्षर्या घेत आहेत. हा चुकीचा विषय असून अशा प्रकारे सत्ताधार्यांनी वागू नये, त्यांच्या निर्णयाला जनता विरोध करत असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिली.

Comments
Post a Comment