विक्रोळी कन्नमवार नगर २ परिसरात मागील तीन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा



विक्रोळी कन्नमवार नगर २ परिसरात मागील तीन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने पालिकेच्या जल विभागाने तातडीने लक्ष घालत या भागात शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

कन्नमवार नगर २ येथील इमारत क्र. ७४ येथे मागील आठवड्यात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली होती. पालिकेच्या जल खात्याने ही जलवाहिनी दुरुस्त देखील केली तरीही गेल्या ३ दिवसांपासून कन्नमवार नगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत आहे. 

नागरिकांनी यासंदर्भात पालिकेच्या जलखात्याकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु पालिका प्रशासन विशेष लक्ष देत नसल्यामुळे येथे दूषित पाण्याचा पुरवठा अद्याप सुरू आहे. त्यामुळे साथीच्या आजारांच्या तक्रारी वाढल्या असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

मागील आठवड्यात येथील एका इमारतीचे बांधकाम करताना १२ फूट उंचीची जलवाहिनी फुटल्याने पालिकेकडून ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली परंतु जलवाहिनी गळती पूर्णपणे थांबलेली नाही परिणामी मागील तीन दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. 

कोरोनाची महामारीपासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्व विषद करणाऱ्या पालिकेकडूनच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने स्थानिक नागरिक करत आहेत. 

Comments