कडवईतील तरुणाने घेतला परिवर्तनाचा वसा
संगमेश्वर : कडवई ओकटेवाडीतील अजित मारुती ओकटे याने बळीराजा पूजन करत घेतला प्रबोधनकार मारुती काका जोशी यांच्या परिवर्तनाचा वसा.
कडवई :ओकटेवाडीतील अजित मारुती ओकटे व रुणाली महादेव मते यांचा विवाह नुकताच पार पडला.लॉकडाउन असल्याने कर्मकांड करत लग्नावर जास्त खर्च न करता पारंपारिक विधींना छेद देत अजित ओकटेने परिसरातील तरुणांमध्ये एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
लग्नानंतर सगळीकडे सत्यनारायणाची पूजा घालण्याची परंपरा चालत आली आहे,पण गेली अनेक वर्षे कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुतीकाका जोशी यांनी बहुजन समाजात परिवर्तन करण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळेच पारंपारिक पूजेला शेतकऱ्यांचा खरे दैवत सम्राट बळीराजा पूजनाचा पर्याय निर्माण झाला आहे.अजितने देखील बळीराजा पूजनाचा मार्ग स्वीकारला.
या बळीराजा पूजनप्रसंगी प्रबोधनकार काका जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाने आता अनिष्ट रूढी आणि परंपरा सोडून सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.विविध उदाहरणे आणि दाखले देऊन या परंपरामधला फोलपणा समजावून दिला.काकांच्या पंचाहत्तरीनिमित्त काकांनी ७५ प्रबोधनाचे कार्यक्रम करण्याचा वसा घेतला आहे.या कार्यक्रमात काकांचे सहकारी विलास डिके यांनी ओबीसी जातीनिहाय जनगणनेचा आवाज दिला.लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.२०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाणा नसेल तर ओबीसी समाज जनगणनेला सहकार्य करणार नाहीत अशी भूमिका उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी घेत त्यांना पाठींबा दर्शविला.
अजितच्या या परिवर्तनाच्या कामात त्याला वाडीतील ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच देवजी ओकटे मास्तर मोलाची भूमिका राहिली.त्याचपद्धतीने युवा कार्यकर्ते दत्ताशेठ ओकटे,सूरज ओकटे,शंकर ओकटे,सुभाष कुल्ये गुरुजी व भावकीतील समाज बांधवांनीदेखील पाठिंबा दिला.अजितच्या या कार्याला पाठींबा देत मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव,सचिव मिलिंद कडवईकर,सदस्य अनिकेत यादव यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

Comments
Post a Comment