बांधकाम खाते अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

 


तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या रस्त्यातून पाण्यासाठी ३ मीटरची पाईपलाईन मध्यातून टाकल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. 

त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न सोमवारी मिरजोळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेत विचारला. यावेळी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेही उपस्थित होत्या. बांधकाम खात्याच्या या रस्त्यावर उत्खनन करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा यावेळी ग्रामस्थांनी वाचला.

मिरजोळे रस्त्याची दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यासाठी या ग्रामस्थांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी तसेच पाण्याच्या पाईपलाईनसाठी नगर परिषदेने केलेल्या खोदाईबाबत ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता नाईक यांची भेट घेत या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

मोबदला प्रकरणाची सर्व कागदपत्रे तपासण्याचे आदेश देत अधीक्षक अभियंता नाईक यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी मिरजोळेचे सुरेंद्र पाटील, महेश पाटील, संजय नागवेकर, राहुल पवार, सुरज पाटील, हर्षराज पाटील तसेच समविचारी मंचचे संजय पुनसकर उपस्थित होते.

नगर परिषदेला नोटीस

या खराब रस्त्यामुळे जाणवणाऱ्या सर्व समस्या लक्षात घेत, अधीक्षक अभियंता नाईक यांनी मिरजोळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नगर परिषदेला त्वरित नोटीस काढून ग्रामस्थांना धोकादायक ठरणार नाही, अशा पद्धतीने पाईपलाईनसाठी खोदकाम करावे, अशा सूचना छाया नाईक यांनी वाळके यांना दिल्या.

Comments