हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबाचा घ्यावा आदर्श.

 फोटोत 

हे कुटुंब शूर वीर तुकाराम ओंबळे यांच कुटुंब आहे.


फ्रेश न्यूज नेटवर्क

ज्या एका पोलीसाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता नराधम कसाबची बंदूक पकडून स्वतःचा प्राण गमावला पण ज्यामुळे कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत हातात आला त्या हुतात्मा तुकाराम ओंबळ्यांच्या कन्येस वैशाली ओंबळे, सर जमशेदजी जिजीभॉय पार्सी बेनोव्हेलंट इन्स्टीट्यूशन ने त्यांच्या वार्षिक दिनाला बोलावले आणि तेथील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला रू. तीन लाखाचा धनादेश तीला देऊ केला. मात्र तो स्विकारायच्या ऐवजी तीने नम्रपणे सांगितले की आईने सांगून पाठवले आहे की, वडीलांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी असे पैसे घ्यायचे नाहीत. त्यांना लहान मुले आवडायची. तेंव्हा याचा उपयोग येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसच करावा. ट्रस्टचे सेक्रेटरी महरूख खरस यांनी सांगितले की,  हे ऐकत असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. मुलांना "देण्या"ची सवय लागण्यासाठी असे प्रकल्प आम्ही करतो. आज वैशालीने आपणहून तेच करून एक सक्रीय आदर्श त्यांच्या समोर ठेवला.


सोलापूरच्या रयत शिक्षण संस्थेने पण अशीच देणगी देऊ केली असता, त्यात स्वतःच्या पैशाने भर घालून ती देणगी ओंबळे कुटूंबियांनी त्याच शाळेस दिली...

हुतात्मा श्री तुकाराम ओंबळे आणि त्यांची वैशाली, तसेच वैशालीची आई यांनी दाखवलेली वृत्ती आणि कृती हे एक प्रकाशात आलेले उदाहरण आहे, प्रकाशात येण्याचे कारणही तसाच प्रसंग पाठीशी असणे आहे. वरकरणी कुठलाही देश/समाज हा जरी त्यातील शासक, राजकारणी आणि उद्योगांवर "चालत" असला तरी त्याचे "टिकणे", हे आपत्काल असो अथवा नसो, स्वतःच्या परीघाबाहेर बघणार्‍या वृत्ती, कृती आणि त्यातून घडणार्‍या संस्कृतीवर अवलंबून असते असे वाटते. त्यात माझा-तुमचा पण हातभार लागत राहोत हीच सदीच्छा...

खरं तर नतमस्तक... असंच म्हणावं लागेल.

हुतात्मा ओंबळे आणि त्यांच्या परिवाराला सादर प्रणाम!



Comments