हेल्मेट सक्तीविरोधात भाजप आमदार, भाजयुमो पदाधिकारी भेटणार वाहतूक पोलिसांना!
रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्ते व हेल्मेट सक्तीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कमी झाले. सामान्य माणूस अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे. परंतु शहरातील प्रचंड खड्ड्यातून गाडी चालवणे कठीण झाले असून त्यातच हेल्मेट सक्ती आणि दंडवसुलीमुळे आणखी त्रास सहन करावा लागत आहे.
याविरोधात भाजपचे प्रभारी व आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत वाहतूक पोलिस निरीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
भाजपचे प्रभारी व आमदार रवींद्र चव्हाण यांचा लवकरच दौरा होणार आहे. रत्नागिरीकरांची व्यथा चव्हाण यांच्याकडे मांडली आहे. ते स्वतः नूतन वाहतूक पोलिस निरीक्षक व आरटीओ अधिकार्याची भेट घेणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री, भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडेही हा विषय मांडण्यात येणार असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
शहरातील खड्डेमय रस्ते कधी सुधारणार? असा सवाल करत काही दिवसांपूर्वीच शहर भाजपने आंदोलन केले होते. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. परंतु सर्व रस्ते चकाचक होण्याची गरज आहे. हेल्मेट सक्तीमुळे व खड्ड्यांतून गाडी चालवल्याने महिला, पुरुषांना मानदुखी, मणका आणि कंबरदुखीचे त्रास सुरू झाले आहेत.
अनेक जण हाडांच्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. याबाबत अनेकांनी भाजपकडेही व्यथा मांडली आहे. त्यामुळे रस्ते चकाचक कराच पण वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती काही काळासाठी थांबवावी, असे मतही अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केले.

Comments
Post a Comment