भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव
भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश यात्रे'चं आयोजन केलं होतं. राम कदम यांच्या निवासस्थानापासून या यात्रेला आज सकाळी सुरुवात होणार होती. पण राम कदम या यात्रेसाठी घराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता. कदम यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी राम कदम यात्रेसाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई केली आहे.
'पोलिसांची ही कारवाई दुर्देवी असून सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे', अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.
पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न केल्याच्या निषेधात जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं राम कदम यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान राम कदम खार येथील आपल्या निवासस्थापासून यात्रेला सुरुवात करणार होते.
पोलिसांनी यात्रेला सुरुवात होण्याआधीच राम कदम यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यात जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा संघटक संतोष जनाठे यांचा समावेश आहे.
दरम्यान, राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी समज देऊन राम कदम यांना सोडले. राम कदम यांनी मात्र आपलं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

Comments
Post a Comment