उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र लेखी परीक्षा मनाई आदेश जारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) लेखी परिक्षा 20 नोव्हेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) ची लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर 2020 ते 05 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2020 या कालावधीत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची लेखी परीक्षा १) केंद्र क्रमांक - 6104-रत्नागिरी , परीक्षा केंद्रस्थळ- फाटक हायस्कूल, सुभाष रोड, रत्नागिरी २) केंद्र क्रमांक -6204 - चिपळूण, परीक्षा केंद्रस्थळ -युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण ३) केंद्र क्रमांक-6301- दापोली, परीक्षा केंद्र स्थळ - अल्फ्रेड गॉडने हायस्कूल, दापोली.
४) केंद्र क्रमांक - 6404- राजापूर, परीक्षा केंद्रस्थळ - राजापूर हायस्कूल, राजापूर तसेच 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) ची लेखी परीक्षा १) केद्र क्रमांक 611 - रत्नागिरी, परीक्षा केंद्रस्थळ - एम.डी.नाईक ॲण्ड ए.एम. नाईक ज्यु. कॉलेज, रत्नागिरी २) केंद्र क्रमांक - 621 - चिपळूण, परीक्षा केंद्रस्थळ - डी.बी.जे कॉलेज, चिपळूण.
३) केंद्र क्रमांक - 631- दापोली, परीक्षा केंद्रस्थळ - एन.के. वराडकर कला व आर.व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली या परीक्षेच्या केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात परक्षिेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम -1951 चे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक असल्याने दत्ता भडकवाड, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) (सन 1951 चा कायदा 22) नुसार मिळालेल्या अधिकारान्वये वरील दोन्ही परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्राच्या स्थळाच्या ठिकाणापासून 100 मीटर च्या परिसरात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून वरील कालावधीत पुढील कृत्ये करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शस्त्रे,सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करणे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईलअशी कृत्ये करणे. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्ससेंटर, टायपिंगसेंटर, ध्वनीक्षेपणइ.माध्यमे सुरु ठेवणे. (आदेशाची मुदत संपेपर्यंत सदर बाबी बंद राहतील.) परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स,ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करणे.
कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करणे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेश. तसेच मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(3)अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पाच किंवा पाच पेक्षा जास्त इसमांना किंवा कोणत्याही जमावास विनापरवानगी एकत्रित येण्यास किंवा मिरवणूक काढण्यास सदर आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी /पोलीसअधिकारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंधराहील.
काही अपवादात्मक परिस्थितीत पाच किंवा पाच पेक्षा जास्त इसमांना एकत्रित येणे आवश्यक झाल्यास त्यासाठी संबंधित क्षेत्राच्या उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Comments
Post a Comment