महाआघाडी सरकार खाली खेचण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम!
महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी व शिवसेनेला सिंधुदुर्गातून हद्दपार करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे. महाराष्ट्र सरकार एकही काम करीत नाही, हे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारने लोकांसाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. कबुलायतदार प्रश्न सोडविणे तेवढे सोपे नाही, असे सांगत जिल्हय़ातील लघुपाटबंधारे प्रकल्प या सरकारने रद्द केले व मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला निधी दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. जिल्हय़ाच्या विकासाला निधी देत नसाल, तर आंदोलन छेडणार, असा इशारा राणे यांनी दिला.
येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर व जिल्हा महिला आघाडीप्रमुख संध्या तेर्से उपस्थित होत्या.
महसूल राज्यमंत्र्यांना काय अधिकार?
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कबुलायतदारांचा प्रश्न पंधरा दिवसांत सोडवितो, असे सांगितले, याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता, त्यांना काय कळते? महसूल राज्यमंत्र्यांना काय अधिकार?, असा सवाल करीत हा प्रश्न एवढय़ा सहज सुटण्यासारखा नाही. त्यासाठी प्रथम कॅबिनेटची बैठक घ्यावी लागते, असे सांगत जर प्रश्न सहज सुटणारा असेल, तर एवढे दिवस का सुटला नाही?, असा प्रतिसवाल त्यांनी केला. मंत्री औरंगाबादला गेल्यावर आपण काय बोललो, ते विसरुन जातील, असे ते म्हणाले.
विकास प्रश्नांवर ते कधी बोलतात का?
कोकणात शिवसेना, राष्ट्रवादीचे अकरा आमदार आहेत खरे. मात्र, रस्ते, शाळा, कोरोना, विमानतळ, सी-वर्ल्ड, पाटबंधारे प्रकल्प यावर त्यांना कधी बोलताना तुम्ही ऐकले का?, जाहीर केलेला निधीही सरकार देत नाही, असे ते म्हणाले. पालकमंत्री कामाचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
सिंधुदुर्गचा विकास थांबणार नाही
आता सिंधुदुर्गचा विकास आम्ही थांबू देणार नाही. आमच्या विकासकामांचा निधी द्या. अन्यथा निधीसाठी आंदोलन छेडू, असा इशारा राणे यांनी दिला. महाविकास आघाडीच्या अकरा आमदारांना आता मी निवडणुकीत खाली खेचणार, असेही त्यांनी सांगितले.
आपले मेडिकल कॉलेज एक डिसेंबरला सुरू
सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले, याकडे लक्ष वेधले असता, आपणही मेडिकल कॉलेजची घोषणा केली. परवानगी मिळाली. आता एक डिसेंबरला कॉलेज सुरू करतो, असे राणे यांनी सांगितले. त्यांनी घोषणा केली, पण जमीन, निधीची तरतुद केली का?, असा सवाल करीत यासाठी केंद सरकारची परवानगी लागते. ती मिळाली का? हे अधिकार राज्याला नाहीत. केंद्र सरकार परवानगी देऊ शकते. तसेच 250 कोटी रु. निधी लागणार, त्याचे काय?, असा सवाल त्यांनी केला.
विमानतळ आम्ही सुरू करणार
विमानतळ सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. पण प्रगती नाही. आमचे केंदात सरकार आहे. लवकरच पेंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन आम्ही विमानतळ सुरू करणार, असे ते म्हणाले.

Comments
Post a Comment