लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयात संविधान दिन साजरा

 दिनांक: २७ नोव्हेंबर, २०२०.


           रत्नागिरी : तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीच्या लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने काल गुरुवार दिनांक: २६ नोव्हेंबर २०२० रोजी

सकाळी ८ ते ११ वा. पर्यंत   क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक सांस्कृतिक सभागृह,  लोकनेते शामरावजी पेजे विद्यानगरी येथे भारतीय संविधान दिन                      

                 आणि

 राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनाच्या निमित्ताने  भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, संविधान प्रतिमापूजन करून झाली. त्यानंतर मंगल वाद्यांच्या स्वरांमध्ये संविधान गीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सादर करून संविधानाची रूपरेषा स्पष्ट केली.

                    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक नितेश केळकर यांनी मांडले. कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले संविधानाने आम्हाला काय दिले? या प्रश्नाची उकल  या कार्यक्रमात नक्की होईल. राष्ट्राला ज्या महान व्यक्तिमत्त्वाची, विचारांची, कार्याची जोड मिळाली असे असे राष्ट्र बलशाली राष्ट्र बनल्याशिवाय राहत नाही आणि ते कार्य जगातील महान राज्यघटना देऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, अशा स्वरूपात त्याने कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

                त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया भिडे हिने केले.

               शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक  विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक  प्रीती पटेल यांनी  विद्यार्थ्यांना व्यवसायाकडे वळण्यासाठी विशेष मार्गदर्शन करून  या महामंडळामार्फत  विविध व्यवसायांसाठी  उद्योगांसाठी  असलेल्या विविध योजना  व कर्जपुरवठा  याविषयी सविस्तर माहिती दिली. 

                    या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षक मा. नुरखाँ  पठाण यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अनेक उदाहरणे, संदर्भ देऊन भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार, मूलभूत हक्क, कलमे, उद्देशिका या सर्वांची सविस्तर व सखोल माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना भारतीय जनतेला दिली ती राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या कल्याणाची त्यांच्या जडणघडणीमध्ये मौल्यवान ठरते. प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास होऊन राष्ट्र बलशाली बनवणारी राज्यघटना आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? असा मार्मिक प्रश्न उभा करून जातीपाती धर्माचे राजकारण न करता ज्या संविधान कर्त्यांनी राज्यघटना आपल्या प्रखर बुद्धीच्या सामर्थ्यावर तयार केली. ती सर्वांच्या दृष्टीने हितावह आहे, त्यामुळे सर्वांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे मौलिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. 

               आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विचार व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी संविधानाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्याचे महत्व प्रतिपादन केले. त्याप्रमाणे आधुनिक विचारांचे बीज विद्यार्थ्यांमध्ये पेरत त्यांच्या आयुष्याला शोधक विचारांची दिशा देत जीवनमार्गात अत्यंत उपयुक्त अशी विचारधारा मांडली.

              या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य राकेश आंबेकर, श्रमिक विद्यालयाचे सहाय्यक संजय घाडी, शामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळाचे वसुली अधिकारी अजित पाटील, पी एस महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला  विद्यार्थी, प्राध्यापक  मास्क, सॅनिटायझर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून उपस्थित होते.

                      या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कल्पना मेस्त्री व उपस्थितांचे आभार प्राध्यापिका शालिनी चांदले यांनी मानले.



Comments