वैतरणा पुलाच्या ६०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी
वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूंस ६०० मीटर कार्यक्षेत्रात ५ नोव्हेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ या कालावधीत पेालीस विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, नौदल, मत्स्य व्यवसाय, वन, तटरक्षक दल, उत्पादन शुल्क इत्यादी शासकीय विभाग वगळून इतर सर्व व्यक्तींना वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या (पूल क्र. ९२ व ९३) दोन्ही बाजूंस ६०० मीटर अंतरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे नौकानयन मार्गाच्या वापरास मनाई असेल.
पूल क्रमांक ९३ हा पालघर ग्रामीण तर पूल क्रमांक ९२ हा विरार-वसई, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येत आहे. पुलाजवळील रेती उत्खनन व नौकानयन बंदीसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून वारंवार अधिसूचना काढल्यानंतर त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस आयुक्त व अधीक्षकांना यासंदर्भात पत्र दिले आहे. पुलाच्या सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच सतर्कता समितीची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
गस्ती नौका नसल्याने प्रशासन हतबल
या पुलाच्या सुरक्षिततेसंदर्भातील अधिसूचनेची अंमलबजावणी होत असल्याची तपासणी करण्यासाठी गस्ती नौका असणे आवश्यक आहे. सन २०१९ मध्ये गस्ती नौका विकत घेण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्या सुमारास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अमलात आल्याने हा निधी राज्य शासनाकडे परत पाठवण्यात आला. त्यानंतर स्पीड बोट-गस्ती नौका विकत घेण्याऐवजी त्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठीचा प्रस्ताव पुढे आला असून त्याबाबत आजवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

Comments
Post a Comment