३ आणि ४ रूपयांचा मास्कच नाही, एन ९५ मास्कची किंमत सरसकट ४९ रूपये
राज्यात एन ९५ मास्क १९ ते ४९ रूपयांना तर दोन पदरी मास्क ३ रूपये आणि तीन पदरी मास्क ४ रूपये दराने विकण्यात यावेत, असे आदेश सरकारने काढले आहेत. याबाबतची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाकडे दिलेली आहे. याबाबतची रिॲलिटी चेक केली असता, सर्रास औषधांच्या दुकानातून हे मास्क चढ्या किंमतीने विकले जात असल्याचे दिसून आले आहे.
काही औषध विक्रेत्यांनी तर हे मास्क आपण अधिक दराने खरेदी केले असताना कमी दराने कसे विकणार, असा प्रश्न करत, आहे त्याच दराने विक्री करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील ठराविक दुकानात एन ९५ मास्कचे दर प्रसिद्ध करण्यात आले असून, ते सरसकट ४९ रूपयांना विकत असल्याचे निदर्शनाला आले.
एन ९५ विकला जातोय ४९ ला
येथील औषध दुकानांमध्ये एन ९५ मास्क ४९ रूपयांना विकले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुपरी आणि तीन पदरी मास्कची किंमतही १० रूपयांपासून सुरू होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयाबाबत माहिती असून, आपण त्या दरानेच मास्क विकत आहोत, असे या विक्रेत्याकडून सांगण्यात आले. दुकानाच्या प्रथमदर्शनी भागात विविध मास्कच्या किमतींचा बोर्ड लावलेला होता.
मास्कच्या किमती चढ्या दराने
शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एन ९५ मास्कची किंमत कुठल्याही विक्रेत्याकडे १९ रूपये दिसत नाही. या विक्रेत्याने ४९ रूपयाचा ह्यएन ९५ह्ण मास्क हा यूज ॲड थ्रो असल्याचे सांगितले. मात्र, हा धुवून तीन - चारवेळा वापरता येतो, असे सांगितले. मात्र, काही विक्रेते काहीच माहिती न देता एन ९५ सांगताच ४९ रूपयांचा हा मास्क देत आहेत. दुपदरी तसेच तीन पदरी मास्कही सरसकट १५ ते २५ रूपये दराने विकले जात आहेत.
कमी दरात कसे विकणार?
शासनाने दर निश्चित केले असले तरी आम्हाला ते त्यापेक्षा जादा दराने खरेदी करावे लागले. मग, आम्ही ते कमी दराने कसे विकणार? आम्हाला हे मास्क संपेपर्यंत याच दराने विकावे लागणार, असे विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे इतर दुकानांप्रमाणेच या दुकानातही एन ९५ मास्क ४९ रूपयाला तर दुपदरी आणि तीन पदरी मास्कची किंमत २० ते २५ रूपये असल्याचे सांगण्यात आले. इतर कापडी मास्कच्या किंमतीवरही कुठलाच अंकुश नाही.

Comments
Post a Comment