भोगावतीमधील आठ वीरांची भोगावती ते रायगड पदभ्रमंती

 देवरुख : प्रतिनिधी 

इतिहासात गाजलेले सात वीर लढाईसाठी धावले होते हाच इतिहास जतन करताना व आरोग्य विषयक जनजागृतीसाठी भोगावती महाविद्यालयाचे प्राध्यापक व मिञमंडळी असे आठ जण भोगावती कुरुकली ते किल्ले रायगड अशी पदभ्रमंती करत संगमेश्वर तालुक्यात पोहचले आहेत. २०९ कि.मी. चे हे अंतर दहा दिवसात पुर्ण करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

           कोरोना पर्वात स्वच्छता व आरोग्य जपावे हा संदेश घेवून हे आठ जण पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाले आहेत. भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक बबन पाटील, ट्रेकर प्रा.राहुल लहाने, यांच्या समवेत उदय चव्हाण, प्रा.संजय पाटील,प्रा.एकनाथ पाटील, प्रा.पवन पाटील, प्रा.टि.एम.पाटील, रवी पाटील, पंढरी पाटील आदींचा समावेश आहे. हे वेडे आठ वीर मंगळवारी संगमेश्वर तालुक्यात पोहचले. प्रथमेश कुलकर्णी यांनी या टीमचे कसबा संगमेश्वर येथे स्वागत केले.

           या आठ जणांच्या टीममध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व गोकुळ दुध संघाचे माजी संचालक एम.आर.पाटील सहभागी झाले आहेत. त्यांचे वय ७० आहे हे विशेष आहे. या मंडळींचा हा पहिलाच प्रयत्न असुन या मोहीमेत माणसे जोडणे, गावांचा इतिहास समजुन घेणे, त्यांच्या नोंदी करणे तसेच कोरोना महामारीबाबत आरोग्यविषयक जागृती करणे हा उद्देश असल्याचे प्रा.राहुल लहाने यांनी सांगितले. रायगडला जावून महारांजाचे आशीर्वाद घेवून भविष्यकाळात अनेक उपक्रम राबवणार असल्याचे या टिमने सांगितले.गावा गावात या आठजणांच्या टीमचे उत्साहात स्वागत केले जात आहे.धर्मवीर संभाजी राजेंच्या संगमेश्वर येथील स्मृती स्थळाला या टिमने भेट देवून पुढे मार्गस्थ झाले.

Comments